जब्बार चीनी, वणी: झेडपी कॉलनीतील होणारे खासगी कोविड केअर सेंटरचे काम स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे थांबवण्यात आले. त्यामुळे वणीत खासगी कोविड केअर सेंटर होणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान परिसरात वाढती रुग्णसंख्या व वाढती मृत्यूसंख्या लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जागेचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.
परिसरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन वणीत खासगी कोविड केअर सेंटर सुरू होणार होते. त्याचे सत्यसेवा हॉस्पिटल येथे युद्धपातळीवर काम सुरू होते. डॉ. महेंद्र लोढा व डॉ. गणेश लिमजे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र कोविड केअर सेंटरमुळे परिसरातील रहिवाशांना कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे कारण देऊन परिसरातील नागरिकांनी याला विरोध केला होता. नगरसेवक नितीन चहाणकर यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी एसडीओ डॉ. शरद जावळे व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेत खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी देऊ नये अशी मागणी केली. त्यानंतर संचालकांनी तिथले काम थांबवले होते.
दरम्यान खासगी कोविड केअर सेंटरचे काम थांबल्याचे कळताच विविध सामाजिक संस्था कोविड सेंटर सुरू करण्यास सहकार्य करण्यास पुढे आल्या आहेत. त्यासाठी विविध संस्थेतर्फे जागेचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत संचालक मंडळ चाचपणी करत असून यात शेतकरी मंदिर या जागेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत संचालकांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कोविड सेंटरसाठी शेतकरी मंदिराचा प्रस्ताव – ऍड देविदास काळे
परिसरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व वाढते मृत्यू ही गंभीर समस्या झाली आहे. आज वणीतून खासगी उपचारासाठी अनेक रुग्ण मोठ्या शहरात धाव घेत आहे. मात्र तिथेही बेड उपलब्ध नाही. जर परिसरात कोविड सेंटर झाले तर उपचारासाठी रुग्णांना शासकीयसह खासगी रुग्णालयाचा पर्यायही खुला राहणार आहे. त्यामुळे आम्ही संचालकांना शेतकरी मंदिर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. जर लवकरात लवकर कोविड केअर सेंटर सुरु झाल्यास त्याचा परिसरातील रुग्णांनाच फायदा होणार आहे. आधीही शेतकरी मंदिर येथे कोविड केअर सेंटर होते. त्यामुळे तो एक चांगला पर्याय ठरू शकते
– ऍड देविदास काळे, संचालक वसंत जिनिंग
सेंटरमुळे शेजारी पॉजिटिव्ह येत नाही – डॉ. महेंद्र लोढा
केवळ गैरसमजातून विरोध होत आहे. आजपर्यंत कोविड केअर सेंटरमुळे कुणी शेजारी पॉजिटिव्ह आल्याची एकही घटना समोर आलेली नाही. उलट कोविड सेंटर रुग्णांचा जीव वाचवते. त्यामुळे सध्या जो काही विरोध होत आहे तो केवळ गैरसमजातून होत आहे. मोठ्या शहरात अनेक ठिकाणी खाली कोविड केअर सेंटर आहे तर वर फ्लॅटमध्ये लोक राहतात. खासगी कोविड सेंटरचा स्थानिक रुग्णांनाच फायदा होणार आहे. येणारा काळ हा आणखी कठिण असणार. आम्ही सुद्धा स्वत:चा जीव धोक्यात घालून उपचार करणार आहोत. आम्हाला विरोध झेलून कोणतेही काम करायचे नाही. त्यामुळे लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. खासगी कोविड केअर सेंटरला स्थगिती दिल्यानंतर अनेक संस्थांनी याबाबत खेद व्यक्त करत आम्हाला जागेसाठी प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत आम्ही विचार करतोय.
– डॉ. महेंद्र लोढा
परिसरात अचानक कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू वाढत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णांना वेळीच आणि योग्य ते उपचार मिळाले तर कदाचित रुग्णांना वाचवणे शक्य होऊ शकते. शासकीय कोविड केअर सेंटरबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक लोक सध्या नागपूर चंद्रपूरसारख्या ठिकाणी खासगी उपचारासाठी धाव घेत आहे. मात्र तिथेही बेडची समस्या असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. सध्या खासगी कोविड सेंटरसाठी अनेक प्रस्ताव आल्याची माहिती संचालकांनी दिली आहे. आता यावर संचालक काय निर्णय घेतात. तसेच याला स्थानिक विरोध करतात की समर्थन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.