वर्धा नदीच्या पुलावरील खड्डयांमुळे अपघातांची भीती

साखरा (कोलगाव)जवळ सळाखी पडल्यात उघड्या, डागडुजीची मागणी

0

तालुका प्रतिनिधी, वणी:  साखरा (कोलगाव) येथून जवळच असलेल्या वर्धा नदीवरील पुलावर खड्डे पडलेत. परिणामी सळाखी उघड्या पडल्या आहेत. उघड्या पडलेल्या सळाखींमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. म्हणून सदर पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील साखरा (कोलगाव) हे यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला असलेलं गाव आहे. परिसरात कोळशाच्या खुल्या खाणी आहेत. खाणीतील कोळसा घुगूस येथील रेल्वे साईडिंगवर नेण्यासाठी मुंगोली ते सिमेंटनगर (घुगूस) दरम्यान वेकोली प्रशासनाकडून  पूल बांधण्यात आला. सदर पूल यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे.

त्यामुळे या पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असते. काही दिवसांपासून या पुलावर खड्डे पडले आहेत. परिणामी खड्डयातील सळाखी उघडया पडल्या आहेत. परिसरातील कोळसा आणि सिमेंट कंपनीत कामगार रात्रपाळीत कामावर येजा करीत असतात. रात्रीच्या अंधारात येजा करताना खड्डे दृष्टीस पडत नाही.

त्यामुळे दुचाकी वाहनांची चाके उघड्या पडलेल्या सळाकीत अडकून अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. सदर खड्डयांच्या डागडुजीकडे होणारे दुर्लक्ष एखाद्या मोठ्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संबंधितांनी पुलावरील जीवघेणे खड्डे त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.