सुशील ओझा, झरी: अज्ञात आजाराने जनावरांचा मृत्यू प्रकरणी अखेर जामनी गावात जिल्हा पशुसंवर्धक व सहा उपायुक्तांनी भेट दिली. जनावरांच्या उपचारासाठी दोन टीम दाखल तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील जामनी गावात गेल्या 15 दिवसात अज्ञात आजाराने 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जनावरे आजारी आहेत. जनावरांवर आलेल्या मरीमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
जनावरांच्या सततच्या मृत्यूनंतरही एकाही डॉक्टरने मेलेल्या जनावरांच्या शवविच्छेदनासाठी सॅम्पल पाठवले नव्हते. याशिवाय मृत्यूची संख्या 35 वर गेली असतानाही याची माहिती वरिष्ठांना देण्याचे सौजन्य दाखवले नव्हते. यामुळे जनावरांना नाहक जीव गमवावा लागला होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने सर्वप्रथम बातमी पब्लिश करत हे प्रकरण व या प्रकरणाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला होता.
अखेर 8 फेब्रुवारीला तालुका गटविकास अधिकारी पंचायत समिती सभापती, सदस्य व स्थानिक डॉक्टरांनी जामनी गावात भेट दिली. तर दिनांक 9 फेब्रुवारीला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ राजीव खेरडे व जिल्हा सहा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉक्टर नागपुरे सह तालुक्यातील डॉक्टरच्या चमू दुपारी 11 वाजता जामनी गावात दाखल झाली.
दरम्यान वरिष्ठ अधिका-यांनी जनावरांकरिता प्राथमिक उपचार व गावठी उपचाराबाबत पशूपालकांना माहिती दिली. आजारी जनावरांच्या उपचाराकरिता 5-5 डॉक्टरांची चमू तयार करण्यात आली आहे. रोज सकाळ व संध्याकाळ ही चमू जनावरांचा उपचार करणार आहे.
पथकामध्ये पथक प्रमुख पशुधन एस एस चव्हाण असून एका पथकात डॉ एस एल राजगडकर, सतीश धंडेकर, डी यु राजूरकर, पी एन बावणे तर दुसऱ्या पथकामध्ये डॉ बालाजी जाधव, एस डब्ल्यू जांभूळे, एम पी झाडे, विनोद मोरे व गजानन मडावी आहे.
जनावरांना फूड पॉयजनिंग?
आलेल्या चमुने आजारी असलेल्या जनावरांची तपासणी केली. तसेच मृत दोन जनावरांचे शवविच्छेदनासाठी सॅम्पल घेतले. हे सॅम्पल यवतमाळ येथे पाठवण्यात येणार आहे. तपासणीनंतर चमूने फूड पॉयजनिंगचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र खरे कारण सॅम्पलच्या रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल अशी माहिती चमूतर्फे वणी बहुगुणीला देण्यात आली.
हे देखील वाचा: