जितेंद्र कोठारी, वणी : विविध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तंबाखू व सुपारीचा कारखाना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. वणी पोलिसांनी शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका आलिशान बंगल्यात सुरु असलेल्या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याचा चालक दीपक चावला यास अटक केली आहे. घटनास्थळावरुन पाऊच पॅकिंग करण्याची ऑटोमॅटिक मशीन, मोठ्या संख्येने ब्रॅडेड कंपन्याचे पाऊच, पॅकिंग केलेले तंबाखू व सुपारीचे पाऊच, सुपारी भरलेले पोते व इतर साहित्य जप्त केले आहे.
दांडिया सुपारी कंपनीच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांनी वणी येथे त्यांच्या कंपनीच्या नावावर बनावट पॅकिंग तयार होत असल्याची तक्रार नोंदवली होती. याबाबत पोलिसांना खात्रीशीर सूत्राकडून माहिती मिळाली की, महादेव नगरीत एका आलिशान घरात हा प्रकार सुरु आहे. माहितीवरून ठाणेदार वैभव जाधव यांनी डीबी पथकासह दीपक चावला यांच्या बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळी बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर मागील बाजूच्या खोलीत बनावट व प्रतिबंधीत ईगल जर्दा व दांडिया ब्रँड सुपारी तयार करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. यावेळी तक्रारदार कंपनीचे अधिकारीही सोबत होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अन्न व औषध मानके अधिनियमाच्या विविध कलमा तसेच शासनाची फसवणूक व कर चोरीच्या कायद्यांखाली गुन्हे दाखल केलेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहोड, पंकज उंबरकर, अमित पोयाम, दीपक वांडर्सकर यांनी धाड टाकण्याची कारवाई पार पडली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा