कायर बसस्टँडजवळ डिझेलची अवैधरित्या विक्री करणा-यावर धाड

डिझेल जप्त, विक्री करणा-या एका इसमाला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील कायर बस स्टँडजवळील कान्हा चहा कॉन्टिग जवळ अवैधरित्या डिझेलची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शिरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी हा छापा टाकला. या कारवाईत 15 लीटर डिझेल जप्त करण्यात आले. प्रशांत प्रकाशचंद भरूट (वय 40, रा. बाजोरिया नगर, संस्कृती भवन जवळ, यवतमाळ, ह.मु. कायर, ता. वणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुरुवारी दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास शिरपूर पोलीस कायर येथे बंदोबस्तावर होते. दरम्यान त्यांना खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली की, कायर बस स्टँडजवळ कान्हा चहा कॉन्टिग परिसरात एक व्यक्ती डिझेलची अवैधरित्या साठवणूक करून त्याची अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.

पोलीस आणि पंचांनी घटनास्थळी पोहोचून संशयित व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत भरूट असे सांगितले. त्याच्या ताब्यातील एका कॅनमध्ये 15 लिटर डिझेल साठा आढळला, ज्याची किंमत प्रतिलिटर 93 रुपयेप्रमाणे 1,395 रुपये आहे. हा साठा कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजनेशिवाय मानवी वस्तीत ठेवण्यात आला होता, ज्यामुळे जिवीतास धोका किंवा दुखापत होण्याची शक्यता होती. परवाना विचारला असता, भरूट याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळले. घटनेचा पंचनामा करून सदर माल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलीस हेड कॉन्स्टेबल झोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत भरूट याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 285, 286 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशन करत आहे. 

Comments are closed.