वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त
मुकुटबन परिसरातील पिकांचं भारी नुकसान, शेतकरीवर्ग चिंतातुर
संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन परिसरात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. मंगळवारच्या रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकाची राखरांगोळी झाली. उभे शेतपीक वादळी आतंकात आल्याने शेती पिकांचे जोरदार नुकसान झाले. परिणामी शेतकरीवर्ग चिंतातुर झाला असून पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
वादळी पावसाने शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर आणि ज्वारी पिकांना चांगलेच झोडपले. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसासह वादळी वाऱ्यांच्या लहरीने शेतातील उभे पिक जमीनदोस्त झाले. परिसरातील बहुतांश गावातील शेकडो हेक्टरवरील शेतीपीक निकामी झाल्याने शेतकरीवर्गांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत.
ह्या आस्मानी संकटामुळे परिसरातील शेतकरी चांगलाच हतबल झाला. पहिलेच कर्जाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शेतकरीवर्गांच्या हाती आलेल्या कपासी, तूर, सोयाबीन आणि ज्वारी पिकांना मंगळवारी रात्रीदरम्यान झालेल्या वादळी पावसाच्या कहराने बेजार केले. शेतातील पिके पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांवर आता मोठे अस्मानी संकट ओढवले असून शेतकरी कर्जाच्या भोवऱ्यात सापडला.
पहिलेच शेतीपिकांना अल्प मिळणारा भाव, शासनाचे अडेलटप्पू धोरण आणि बँकांचे तसेच खाजगी कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी आहे. अस्मानी संकटाने कहर माजवून शेतकऱ्यांना डबघाईस आणून सोडले. यात शेतकरी चांगलाच हतबल झाला. परिसरातील झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. याकरिता झरीजामणी महसूल विभागाकडे शेतवरीवर्ग सरसावत आहेत.