विलास ताजने, वणी: खरीप पिकांचा हंगाम काढणीच्या टप्प्यात आहे. उत्तरा नक्षत्रात सतत पडत असलेल्या पावसाने खरीप पिके उद्ध्वस्त झालीत. पेरणीपासून खरीप पिकांना पोषक पाऊस पडत होता. वेळच्यावेळी होणाऱ्या योग्य व्यवस्थापणामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके चांगलेच बहरले होती. कापूस, सोयाबीन पिकांना फळधारणाही समाधानकारक झाली. परंतु उत्तरा नक्षत्रात पडत असलेल्या लहरी पावसाने जूनच्या पहील्या पंधरवड्यात पेरणी झालेल्या खरीप पिकांची प्रचंड हानी झाली आहे.
कापूस, तुरीची पिकं सोसाट्याच्या वाऱ्याने जमिनीवर आडवी झोपलीत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. सततच्या पावसानं पिकांना अंकुर फुटलेत. परिणामी यावर्षी चांगलं उत्पन्न येण्याचा बळीराजाचा आनंद क्षणभंगुर ठरला आहे.
वणी तालुक्यातील खेड्यापाड्यातील शिवारात मृग नक्षत्रात कापूस, सोयाबीन, तूर पिकांची पेरणी आटोपली. काही निवडक गावात दुबार पेरणी करावी लागली. जलसिंचनाची सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करता यावी, म्हणून खरीप हंगामात कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन, कापूस बियाणांच्या जातीची लागवड करतात. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लवकर काढणीस येणाऱ्या जातींची लागवड केली आहे.
सध्या अर्ली व्हेरायटी सोयाबीनच्या शेंगा परिपक्व झाल्या असून पीक कापणीस होत आहे. कापसाची बोंडे परिपक्व झाली आहेत. काही शेतात कापूस फुटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र उत्तरा नक्षत्रात पडत असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोयाबीनच्या शेंगात अंकुर फुटले. तर कापसाची बोंडे काळवंडली असून सडायला लागली आहे. ऐन काढणी, वेचणीस आलेलं पिकं नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांना नैराश्य येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाची पहिली वेचणी होऊन दसरा, दिवाळी सण आनंदात जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु उत्तराच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. कापसाच्या प्रत्येक झाडांची खालच्या बाजूस लागलेली १५ ते २० बोंडे सडल्याने कापूस उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे. तसेच पहिल्या वेचणीच्या कापसाचा दर्जाही खराब होऊ शकतो. सोयाबीन, कापूस पिकांच्या लागवडी पासून पीक व्यवस्थापनावर जवळपास १०० टक्के खर्च झाला आहे.
अशा वेळी पीक हातातून गेल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहरी निसर्ग, वन्यप्राण्यांचा हैदोस, शासनाची शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. कृषी विभागाने पिकं नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी नेते देवराव धांडे, दशरथ बोबडे यांनी केली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)