पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी : विदर्भात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुढचे तीन दिवस विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ते 24 मे दरम्यान वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह मध्यम व जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

अंदमानात शुक्रवारी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल पुढच्या दिशेने सुरू झाली आहे. शनिवारी बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात झाली. दरम्यान, विदर्भात 22 ते 24 मे दरम्यान पाऊस, तर उर्वरित राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. बंगालचा उपसागर विस्तीर्ण असल्याने तो पूर्ण पार करण्यास मान्सूनला आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्यानंतर तो कर्नाटककडे येईल, असा अंदाज आहे.

राज्यात फक्त विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला असून, 22 ते 24 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने मध्य प्रदेशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. त्या मार्गाने पाऊस विदर्भात येण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार असून, कोकणला वेदर डिसकम्फर्टचा पुन्हा इशारा देण्यात आला आहे.                              (साभार – पुढारी)

Comments are closed.