वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…
सांडपाणी जाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर
जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. अनेक कॉलोनीमध्ये खुल्या जागेवर पाणी जमा होऊन तळ्याचे स्वरूप आले आहे. तर ओपन स्पेस समोर पाणी साचल्याने घरातील रहिवासीयांना बाहेर निघणे कठीण झाले आहे. कॉलोनी मधील पावसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे शहरात जागोजागी पाणी जमा झाले आहे.

येथील नांदेपेरा मार्गावर जगन्नाथ महाराज मठ समोर डांबरी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याच मार्गावर जि. प. शाळा क्रमांक 5 च्या मागे पोस्ट कॉलोनीमधील नागरिकांच्या घरासमोर रस्त्यावर पाणी साचल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे. या प्रभागाचे नगर परिषद सदस्यकडे नागरिकांनी रस्ता सुधारणा करण्याची अनेकदा विनंती केली. मात्र नागरिकांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. शहरातील काळे ले आऊट मधील नागरिकांनीही जागोजागी पाणी जमा होत असल्याची तक्रार ‘वणी बहुगुणी’कडे केली आहे.
शहरालगत नव्याने तयार झालेल्या ले आऊट मधील रस्त्यांची परिस्थिती विदारक दिसून आली. शहरात अनेक ठिकाणी नव्याने तयार झालेले सिमेंट काँक्रीट रस्ते पहिल्याच पावसात जागोजागी उघडले आहे. संपूर्ण शहरात लाखों रुपये खर्च करून भूमिगत गटार बांधण्यात आले आहे. मात्र निकृष्ठ बांधकाम व साफसफाईच्या अभावी अनेक ठिकाणी चेंबरमधून सांडपाणी वाहत आहे.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी
सांडपाणी जाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे नाल्यालगत परिसरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढून साथींच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. शहरात जागो जागी भरलेले पाण्यासाठी आउटलेटची व्यवस्था नगर परिषदेने करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
हे देखील वाचा:
बाजार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले