झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

अडेगाव लगत भोंगा बुजल्याने मुख्य मार्ग जलमय

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे पैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. अडेगाव लगत रस्त्यातील भोंगा बुजल्याने मुख्य मार्ग जलमय झाला आहे. तर खातेरा गावालगत असलेल्या मंदिरापर्यंत नदीचे पाणी शिरले आहे. संततधार पावसामुळे अद्याप तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.

अडेगाव मार्गावरील अनेक ठिकाणावरील लहान रफटे भरल्याने नागरिकांना खातेरा, आमलोन ,तेजापूर, वेदडसह इतर गावाला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. अडेगाव गावालगत असलेल्या रफट्यातील भोंगा बुजल्याने गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. खातेरा गाव पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असून नदीचे पाणी गावाजवळ असलेल्या मंदिरापर्यंत पोहचले आहे.

दिग्रस जवळलील महाराष्ट्र तेलंगणाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पूलाजवळ पर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. तालुक्यात पावसामुळे किंवा पुरामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास महसूल, आरोग्य, पोलीस, इतर विभाग सज्ज असून कोणतीही घटना घडल्यास वरील विभागाच्या अधिकारी किंवा तहसील कार्यालयात विशेष कक्षात फोन करून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या तरी कोणतेही नुकसान झाल्याचे माहिती नसून आणखी दोन दिवस पाऊस न थांबल्यास नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा:

वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…

मारेगाव-वणी रोडवरील “ते” खड्डे ठरताहेत जीवघेणे

Leave A Reply

Your email address will not be published.