वेकोलिच्या प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी

राजू उंबरकर यांची शेतक-यांना सोबत घेऊन वेकोलि कार्यालयात धडक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील पैनगंगा, मुंगोली आणि कोलगाव या कोळसा खाणीतून कोळशाची वाहतूक चालू आहे. वाहतुकीत कालबाह्य वाहनांचा वापर आणि मोठया प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीमुळे येणंक, येणाडी, शिवनी, कोलगाव, शेवाळा या गावातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. तर रस्त्यांवरून वाहतुकी वेळी उडणाऱ्या धुळीमुळे शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुसकान भरपाई द्यावी तसेच रस्ते तयार करून द्यावे. याकरिता मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी दिनांक २४ नोव्हेंबर रोजी वेकोलि कार्यालयावर धडक दिली. 

वणी विभागासाठी वरदान असलेल्या कोळसा खाणी मात्र वेकोलि प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे सामान्यांसह शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. परिसरातील पैनगंगा व मुंगोली या कोळसा खाणीतून सध्या कोळशाची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे. वाहतूक करणारी वाहने कालबाह्य तर झालीच, परंतु अनेक वाहनांना नियमाप्रमाणे आवश्यक असलेले साहित्यसुद्धा अपूर्ण असून, अनेक वाहनांचे टायर कमी, काही पंक्चर, तर काही फुटलेल्या अवस्थेत असल्याने या वाहनांमुळे परिसरातील रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे.

शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून वेकोलि प्रशासनाकडे ते सादर करावी अशी मागणी उंबरकर यांनी काही दिवसापूर्वी कृषि विभाग आणि महसूल प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत महसूल विभाग व कृषी विभागाने तात्काळ सर्व पिकांचे पंचनामे व सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वे.को.लि.कडे पाठविला परंतु बरेच दिवस उलटूनही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

त्यामुळे राजू उंबरकर यांनी या विभागातील शेतकऱ्यांना सोबत घेत क्षेत्रिय महाप्रबंधक ताडाळी चंद्रपूर येथे धडक दिली. यावेळी त्यांनी शेती पिकांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व त्याच बरोबर ह्या रस्त्यांची बांधणी करुन द्यावी अशी मागणी केली.

वाहतूक करीत असताना उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेती पिकांवर याचा परिणाम होऊन उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने ही वाहतूक अवैधरीत्या चालू असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोळसा खाणीमधून कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणामुळे आणि उडणाऱ्या धुळीमुळे कापूस पीक उत्पादक शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले. जर येत्या २८ तारखेपर्यंत शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेऊन भव्य आंदोलन करेल, असा इशारा मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.

यावेळी नुकसान ग्रस्त शेतकरी रामकृष्ण बोबडे, प्रभाकर डाहुले, संजय पंडीले, मारोती मिलमिले, रविंद्र मसाडे, अनिल भोंगळे, दिलीप भोंगळे, रामचंद्र ठोंबरे, रविंद्र काकडे, हरिदास जेणेकार, प्रविण मोजे, बापूराव पंडीले यांच्या सह मनसेचे फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, रणजित बोंडे, गजानन ठाकरे, साई उगे यांच्या सह या गावातील हजारो शेतकरी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

4 दिवसांचा अल्टीमेटम
कोळसा खाणीमधून कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणामुळे कापूस पीक उत्पादक शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले. जर येत्या २८ तारखेपर्यंत शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेऊन भव्य आंदोलन करु.
– राजुू उंबरकर
नेता – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments are closed.