रासा येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
विवेक तोटेवार, रासा: तालुक्यातील रासा रोडवर असलेल्या धाब्यातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर झालेल्या कारवाईत एक महिला व दोन इसमाना अटक करण्यात आली आहे.
रासा रोडवर असलेल्या धाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांनी सोबत दोन पंच व चित्रफिती काढण्यासाठी फोटोग्राफरला सोबत घेतले. गुरुवारी 24 तारखेला दुपारी 2 वाजताच्या सुमारास सर्वांना सोबत घेऊन पोलिसांनी धाब्यावर धाड टाकली.
त्या ठिकाणी एक महिला नाव माया शंकर दुर्गे (36) रा. रासा ही समोर बसून होती. तीच त्या धब्याची मालकीण असल्याचे तिने सांगितले. कसून विचारपूस केली असता समजले की, धाब्यावर अवैध दारूची विक्री होत आहे. तिच्या सोबत धाब्यावर काम करणारे नोकर सुभाष सदाशिव बोबडे (40) व दिलीप कवडू क्षीरसागर (29) हेही तिच्या या कामात साथ देत असल्याची माहिती समोर आली. धाब्याची झडती घेतली असता त्या ठिकाणी इंग्रजी व देशी दारूचा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण 12,374 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सोबत अवैध दारू ठेवण्यासाठी उपयोगात आणलेले फ्रिजर व बंद असलेला फ्रीज ज्याचा उपयोग दारू लपविण्यासाठी केला होता, दोन्ही जप्त करण्यात आले. अवैध दारू व उपयोगात आणलेल्या वस्तू असा एकूण 42374 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील तीनही आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांन्वये कलम 68 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, अमित पोयाम, दीपक वंडर्सवार , नितीन सलाम, महिला पोलीस कर्मचारी नीलम कोडापे व वाहन चालक बाळासाहेब गव्हाणकर यांनी केली.