…आणि गोतस्करी करणाऱ्या वाहनाने घेतला पेट

मध्यरात्री पाठलाग करताना रंगला थरार...

0

विवेक तोटावार, वणी: वणी तालुक्यातील रासा येथे घोन्सा रोडवर असलेल्या गोरक्षण मधून जनावरे चोरी करून नेणाऱ्या पीकअप वाहनाला अपघात झाला. अपघातानंतर वाहनाने पेट घेतला. यात वाहन जळून खाक झाले, तर पोलीस व गोरक्षण चालक यांच्या सतर्कतेने वाहनातून पाचही जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.

रासा या ठिकाणी घोन्सा रोडवर नरेश हेमंतराव निकम यांचे श्रीराम गोरक्षण ट्रस्ट आहे. फोनवरून त्यांना त्यांच्या गोरक्षणातून काही इसम जनावरे चोरी करीत असल्याचे कळवण्यात आले. ज्यामध्ये 2 गाई व तीन गुरे ज्यांची किंमत अंदाजे 60 हजार आहे.

नरेश यांनी काहीच विलंब न करता तारांच्या कुंपणाकडे धाव घेतली. त्या ठिकाणचे कुंपण तोडून एक पीकअप वाहन रोडवर जनावरे वाहनात कोंबत असल्याचे दिसले. त्यांनी बॅटरीच्या उजेडात जवळ जाऊन बघितले असता जनावरे गाडीत भरून चोरट्यानी तेथून पळ काढला. शेजारीच राहणाऱ्या इसमासोबत नरेश यांनी दुचाकीने पीकअप वाहनाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. वाहन अधिक वेगाने चालविण्याच्या नादात चालकाचा तोल गेला व पीकअप वाहन कुंभारखणी वळणावर झाडावर आदळले.

शॉट सर्किटमुळे वाहनाने पेट घेतला. त्यादरम्यान चालकसोबत इतर दोन जण पळताना दिसून आले. परंतु या ठिकाणी पेटत्या वाहनातून जनावरांना वाचविणे आवश्यक होते. म्हणून नरेश व त्याचा शेजारी व इतर दोन जणांच्या मदतीने जनावरांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. त्यातील एक गाय काही प्रमाणात भाजली. परंतु तिलाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सकाळी 5 वाजताच्या दरम्यान नरेश यांनी वणी पोलिसात फोन करून माहिती दिली. पोलिस व अग्निशामक घटनास्थळी पोहचले. त्यांनी वाहनाची आग विझवून वाहन जप्त केले व पोलीस ठाण्यात आणले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. अशोक काकडे यांच्यासह अजय शेंडे यांनी केली. नरेश निकम यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध कलम 379, 279, 429, 34, भादंवी सह कलम 11(घ) (ड), (झ) प्राणी निर्दयतेने वागविण्याचा कायदा 5(अ), (ब), प्राणी संरक्षण अधिनियम 134(अ), (ब)/177 नुआर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.