वणीत भर दिवसा राजरोसपणे टिप्परने वाळूची तस्करी

प्रशासनाला माहिती देऊनही दुर्लक्ष, 'वणी बहुगुणी'च्या हाती तस्करीचा व्हिडीओ

0

विवेक तोटेवार, वणी: 1 मेला कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असते. याचा फायदा घेऊन वणीत जुन्या विवेकानंद शाळेजवळ एका टिप्परने दिवसभरात 6 ते 7 ट्रिप मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही सजग नागरिकांनी याबाबत महसूल विभागाला माहिती दिली, मात्र महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष करत घटनास्थळी पोहोचून याची चाचपणी करण्याची तसदी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाळू तस्कर आणि महसूल प्रशासनाची मिलीभगत तर नाही असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. दरम्यान याचा व्हिडीओ व्हायरल होत असून ‘वणी बहुगुणी’च्या हाती या तस्करीचा व्हिडीओ आणि फोटो आले आहेत.

यावर्षी रेतीघाट उशीरा सुरू झाले. तसेच गेल्या वेळी पेक्षा त्याचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रिप मारण्याच्या प्रकाराला सध्या ऊत आला आहे. 1 मेला सार्वजनिक सुट्टी असल्याचा फायदा घेऊन वणीतील जुन्या विवेकानंद शाळेच्या मोकळ्या जागेवर एका टिप्परने 6 ते 7 ट्रिप वाळू टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही तस्करी भरदिवसा राजरोसपणे दिवसभर सुरू होती.

एकाच रॉयल्टीपासवर अऩेक ट्रिप सुरू असल्याचे काही सजग नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच फोन आणि मॅसेज करून एसडीओ व महसूल विभागाच्या कर्मचा-यांना या तस्करीची माहिती दिली. मात्र याला कोणत्याही अधिका-यांनी उत्तर दिले नाही. तसेच जागेवर जाऊन पास चेक करण्याची तसदी घेतली नाही. आज गुरूवारी देखील याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. मात्र आजही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या तस्करीला महसूल प्रशासनाची मूक संमती तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.

रेती तस्करीचा व्हि़ड़ीओ व्हायरल
टिप्परद्वारे रेतीची तस्करी होत असल्याचा व्हिडीओ व फोटो काही सजग नागरिकांनी घेतले. हे व्हिडीओ आणि फोटो ‘वणी बहुगुणी’च्या हाती आले आहेत. त्यात एकाच टिप्पर द्वारा रेतीच्या अऩेक ट्रिप मारत असल्याचे दिसत आहे. सध्या महसूल विभागाने एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रिप मारणा-या ट्रॅक्टरवर कार्यवाहीचा धडाका लावला आहे. तहसिल परिसरात कार्यवाही करण्यात आलेले अनेक ट्रॅक्टर सध्या उभे आहेत. मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने वाळू घेऊन जाणा-या टिप्परवर मात्र महसूल प्रशासन मेहरबान असल्याचे दिसत आहे. टिप्परने वाळूंची वाहतूक करणारे मोठे मासे असल्याने कार्यवाहीचा दिखावा करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या छोट्या माशांवर कार्यवाही करत मोठ्या माशांना सुट देत असल्याचा संशय यामुळे निर्माण होत आहे.

सध्या वणीतील अनेक बांधकाम साइटवर अवैधरित्या वाळू टाकली जात आहे. यावर महसूल प्रशासनाचे काम आहे की ही वाळू वैधरित्या आणली गेली आहे की प्रशासनाचा महसूल बुडवून आणली आहे याची चाचपणी करणे. मात्र प्रशासन राजरोसपणे चालणाऱ्या या तस्करी कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. अवैध वाळू तस्करी ची माहिती सर्वसामान्य लोकांनी दिल्यावरही महसूल प्रशासन कार्यवाही करत नसेल, तर हे प्रशासनाच्या मूक संमतीने तर सुरू नाही, असा सवाल ही उपस्थित होत आहे.

लिंकवर वाळू तस्करीचा व्हिडीओ..

Leave A Reply

Your email address will not be published.