ऑनलाईन भामट्यांचा सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल 37 लाखांचा गंडा

सावधान... आता सेवानिवृत्त कर्मचारी ऑनलाईन भामट्यांच्या रडारवर.... पॉलिसी मॅच्युअर झाल्याचे सांगून फसवणूक

विवेक तोटेवार, वणी: आयुष्याची संपूर्ण जमापुंजी फक्त एका फसव्या कॉलमुळे शहरातील एका सेवानिवृ्त्त व्यक्तीला गमावावी लागली. पॉलिसीची रक्कम देणे असल्याचे आमिष दाखवून ऑनलाईन भामट्यांनी एका सेवानिवृत्त प्राचार्याला चक्क 37 लाखांचा गंडा घातला आहे. भीती दाखवत सुमारे दोन महिने त्यांना गंडा घालणे सुरू होते. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त प्राचार्यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की शहरातील आनंद नगरमध्ये मारोती महादेव घागी (67) हे राहतात. ते मारेगाव येथील एका कॉलेजमधून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहे. त्यांनी एचडीएफसी बँकेची मॅक्स ही पॉलिसी काढली होती. दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांना दिल्ली वरून अमरिश गुप्ता नामक एका व्यक्तीचा पॉलिसी संदर्भात दिल्लीहून फोन आला होता. त्याने घागी यांना त्यांची पॉलिसी मॅच्युअर (मुदत संपली) झाली असून त्याचे 4 लाख 67 हजार रुपये देणे असल्याची बतावणी केली. तसेच त्यांना 46 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार अन्यथा 1.5 लाख रुपये कटून अवघे तीन लाख रुपये अकाउंटमध्ये मिळणार अशी भीती देखील दाखवली.

46 हजारांमुळे 1.5 लाखांचे नुकसान होऊन नये म्हणून त्यांनी पैसे भरण्यास होकार दिला. त्यावरून सदर भामट्याने त्यांना बँकेचा अकाउंट नंबर दिला. घागी यांनी सदर अकाउंटवर वणीतील एका बँकेतून 46 हजार रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारा सेंड केले. त्यानंतर त्यांना कंपनीच्या वकिलांनी पैसे पाठवण्यास तांत्रिक अडचण येत असल्याचे सांगून आणखी 93 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. ती रक्कम देखील त्यांनी भरली.

त्यानंतर त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येणे सुरू झाले व दर वेळी वेगवेगळे कारण सांगून त्यांना पैशाची मागणी करणे सुरू झाले. सदर भामट्याने कधी इन्कम टॅक्स विभागातून तर कधी जीएसटी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची भीती दाखवली. कारवाईच्या भीतीने ते पैसे भरत गेले. दिनांक 1 जानेवारी 2022 पर्यंत ही रक्कम 36 लाख 87 हजारांपर्यंत गेली. अखेर फसगत होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणी तोतया अधिकारी अमरिश गुप्ता व त्यांच्या सहका-यांविरोधात भादंविच्या कलम 420 व आयटी कायद्याच्या कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

पैसे भरण्याची गरज नाही – विमाक्षेत्र एक्सपर्ट
आपल्या पॉलिसीचे पैसे आपल्याला परत मिळण्यासाठी कोणतीही रक्कम भरावी लागत नाही. जर पॉलिसीची नियमीत हफ्त भरलेले असेल किंवा पॉलिसीबाबत कोणताही ड्यु नसेल तर पॉलिसी म्यॅच्युअर्ड झाल्याच्या दिवशीच ग्राहकांनी दिलेल्या अकाउंट नंबरवर पैसे जमा होतात. यासाठी पॉलिसी बॉन्ड देखील जमा करण्याची गरज नाही. जर कुणी पॉलिसीच्या नावावर कॉल करून पैसे मागत असेल तर तात्काळ तुमचे विमा अभिकर्ता किंवा सदर कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन भेट दिल्यास होणारी फसवणूक टाळता येऊ शकते.
– हेमंत टिपले, विमाक्षेत्र एक्सपर्ट

आता सेवानिवृत्त कर्मचारी ऑनलाईन भामट्यांच्या रडारवर
सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीची मोठी रक्कम मिळते. अधिकाधिक सेवानिवृत्त लोक हे टेक्नोसॅव्ही नसल्याने ते ऑनलाईन फसवणुकीबाबत अनभिज्ञ असतात. याचाच फायदा भामटे घेत असून कधी कॅशबॅक, कधी एटीएम बंद झाले, कधी केवायसी तर कधी ड्रॉ लागल्याचे सांगून फसवणूक करतात. अलिकडेच वणीत ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून व गाडी पार्सल करण्याच्या नावावर फसवणूक केल्याची घटना ताजी असताना ही घटना घडली आहे. परिसरात दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे. आपला ओटीपी कुणाला सांगू नका किंवा काही पैशाचे आमिष दाखवल्यास याबाबत तात्काळ सल्ला घेण्याचे आवाहन ‘वणी बहुगुणी’द्वारा करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

गंडा..! ऑनलाईन कपडा खरेदी पडली महागात

कुरिअरसाठी दिलेली बुलेट लंपास, वणीतील तरुणाची फसवणूक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.