सर आली धावून, रस्ते गेले वाहून…….

दोन पावसातच नवीन रस्ते उखडले

0

विवेक तोटेवार, वणी: ‘सर आली धावून रस्ते गेले वाहून’ ही केवळ कविकल्पना नाही. वणीकरांनी हा अनुभव वारंवार घेतला आहे. एक तर वर्षानुवर्षे उखडलेल्या, खड्डयांच्या रस्त्यांनी वणीकर त्रस्त आहेत. आता आपली ‘वाट’ सुकर होईल असं वाटत असतानाच एक-दोनवेळा पाऊस येतो. या दिवास्वप्नावर ‘पाणी’ फिरतं. नुकत्याच तयार झालेल्या दीपक टॉकीज ते जंगली पीरची कहाणीदेखील काही वेगळी नाही. एक-दोन पावसांनीच हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. ही निसर्गाची किमया नाही तर हे अनैसर्गिक मानवी भ्रष्टाचाराचं काम आहे. असा आरोप सध्या होतोय.

दीपक टॉकीज ते जंगली पीर रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासन होती. अखेर नगर पालिकेतर्फे या रस्त्याचे काम करण्यात आले. या वर्षी 2019 मध्ये मे महिन्यात पूर्ण करण्यात आले. समस्या सुटली असे वणीकरांना वाटले. परंतु जून आणि जुलै या दोन महिन्यांत फक्त 8 दिवसांच्या पावसाने पूर्ण रस्ता उखडला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची समस्या अधिकच बिकट झाल्याचे आता लक्षात आले आहे. 

जून महिन्यात चार दिवस व जुलै महिन्यात पाच ते सहावेळा पाऊस झाला. या दोनदा झालेल्या पावसानेच या रस्त्याची पूर्ण चाळणी झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रोडची गिट्टी उखडली. केवळ दोन महिन्यांतच हा प्रकार झाल्याने रवींद्र कांबळे यांनी याबाबत जिल्हाधीकाऱ्यांकडे तक्रार देऊन दोषींवर कारवाई करण्याचे निवेदनात म्हटले आहे.

या रस्त्याची चौकशी गुणनियंत्रक विभागाद्वारे करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. सदर रस्त्याचे काम हे पन्नास ते साठ लाख रुपयांचे असून या रस्त्याच्या कामात अनेक झोल असल्याचे दिसून येत आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकारात दोषींवर काय कारवाई होते याकडे आता वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे.

प्रश्न केवळ याच रस्त्याचा नाही

नगर पालिकेद्वारा करण्यात येणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे का असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत. मोमिनपुरा येथील रस्ता तयार होताच उखडल्याने नगर  पालिकेवर चौफेर टीका झाली होती. आता या प्रकरणाची शाई वाळत नाही तोवर दीपक टॉकीज ते जंगली पीरच्या रस्त्याची दैनावस्था समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले रस्ते उखडत नाही व दरवेळी नगर पालिकेने तयार केलेले रस्तेच का उखडतात असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.