शेतकऱ्यांसाठी हक्काची व्यवस्था संभाजी ब्रिगेड निर्माण करेल: सौरभ खेडेकर.

वणीत पार पडला संभाजी ब्रिगेडचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा

0

विवेक तोटेवार, वणी: या देशात मायबाप शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करुन शेतीव्यवस्था नेस्तनाबूत करण्याचं षडयंत्र सुरू आहे. याद्वारे शेतकऱ्यांना सरकार आत्महत्येस भाग पाडत आहे. शेतकऱ्यांना सत्तेतुन बाद करुन मायबाप शेतकऱ्यांच्या हक्काची व्यवस्था संभाजी ब्रिगेड निर्माण करेल, अस विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केला आहे. वसंत जिनिंगच्या सभागृहात रविवारी पार पडलेल्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इंजि.अनंत मांडवकर, प्रमुख मार्गदर्शक सौरभ खेडेकर, विचारपिठावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, पं.दे.शि.प.राष्ट्रीयअध्यक्ष पप्पु पाटिल भोयर, शिवधर्म समन्वय देवानंद कापसे, संभाजी ब्रिगेडचे केन्द्रीय निरिक्षक चंद्रकांत वैद्य, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय धोबे आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात सद्य स्थितीवर राजकारणाचे झालेले विद्रुपीकरण यावर चिंतन मंथन करण्यात आले.

सौरभ खेडेकर म्हणाले की सत्ताधाऱ्यांना ग्रामीण मतदारावर मत देणार म्हणून विश्वास नसल्याने शहरी मतदाराना खुश करण्यासाठी पाकिस्तानातुन साखर आयात करुन शहरी लोकांना साखर स्वस्त दरात देण्याचं आमिष देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना संभाजी ब्रिगेड यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडून येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकित महाराष्ट्रात किमाण १५० जागा लढवून विधानसभेत आपले पदार्पण केल्याशिवाय राहणार नाही. संभाजी ब्रिगेड पक्ष स्थापनेला केवळ दिड दोन वर्षाचा काळ झाला असताना महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायत वर ३५० च्यावर सरपंच, सदस्य निवडून आल्याने त्या ठिकाणी विकासात्मक बदल जनतेनी अनुभवलाही असल्याचे जाणवत असल्याचेही ते म्हणाले.

या मेळाव्याला मारेगाव, वणी,झरी,पांढरकवडा येथील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी केले, सुत्रसंचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले तर आभार वसंत थेटे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.