संविधान दिनानिमित्त वणीत बाईक रॅलीचे आयोजन
संविधानाचा दुरुपयोग होऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येकांची: गीतघोष
कृपाशील तेलंग, वणी: भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ शाखा वणीच्या वतीने ६८ व्या संविधान दिनानिमित्त वणी शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानानाचे महत्व पटवून देणे, लोकशाही समृद्ध करणे हा या रॅलीच्या आयोजनामागचा उद्देश होता. ही रॅली सकाळी 11 वाजता भीमनगर येथील बुद्धविहारामधून सुरू झाली तर त्याचा समारोप दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला.
सकाळी रॅलीत सहभागी होण्यासाठी सुमारे 150 बाईकचालक सहभागी झाले होते. भीमनगर येथून सुरू झालेली ही रॅली दामले नगर येथे पोहोचली. तिथल्या विहारात बुद्धवंदना घेऊन संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर ही रॅली पुढे मनीष नगर मार्गे, संविधान चौक बायपास मार्गे लालगुडा येथे पोहोचली. तिथून जुना लालगुडा, वागदरा, रंगनाथ नगर, महात्मा फुले चौक, सम्राट अशोक नगर करत त्याचा समारोप वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला.
यावेळी संविधान हक्क परिषदेचे गीतघोष यांनी बाईक रॅलीला समारोपीय मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले.
बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा हा उपेक्षीत आणि आदिवासी समाजाला झाला आहे. पण आजच्या काळात राजकारणी संविधानाचा दुरुपयोग करताना दिसत आहे. त्यामुळे उपेक्षीत आणि वंचित समाजाच्या हक्कावर गदा येत आहे. त्यामुळे संविधानाबाबत जनजागृती करणे आणि त्याचा दुरुपयोग होण्यापासून रोखणे हे प्रत्येक लोकशाही प्रेमींचे कर्तव्य आहे असे विचार गीतघोष यांनी मार्गदर्शनपर भाषणात मांडले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारिपचे जिल्हा सहसचिव भारत कुमरे, वणीचे तालुकाध्यक्ष मंगल तेलंग, शहर अध्यक्ष प्रशिल उर्फ़ बंटी तामगाडगे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, रमेश तेलंग, अॅड.मानकर, पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रलय तेलतुंबडे, तालुका सचिव किशोर मून, अजय खोब्रागडे, सुधीर पडोळे, दहेगाव (घोन्सा)शाखेचे अध्यक्ष बाळुभाऊ निखाडे इत्यादींनी परिश्रम घेतले.