बहुगुणी डेस्क, वणी: नवीन घराच्या बांधकामासाठी साठवलेली रेती चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. वणीतील नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे रविवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली. अचानक घरमालक पोहोचल्याने 3 चोरट्यांनी वाहन घटनास्थळी ठेवून पळ काढला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता बांधकामासाठी साठवलेली रेती देखील चोरट्यांच्या रडारवर असल्याने घरमालकांची चिंता वाढली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी प्रफुल हनुमान वांढरे (वय 29) हे तुळजाभवाणी नगर, नांदेपेरा रोड येथे भाड्याने राहतात. त्यांच्या नवीन घराचे नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे काम सुरु आहे. त्यांनी शनिवारी बांधकामासाठी 6 ब्रास रेती खरेदी केली होती. सदर रेती त्यांच्या बांधकामस्थळी साठवली होती. रविवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता बांधकामस्थळावरील लाईट बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते साईटवर गेले. तिथे त्यांना लाईट कुणीतरी काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते घरी परत आले.
लाईट चोरीला गेल्याने त्यांचा संशय बळावला. त्यामुळे रात्री 11:30 वाजता ते सहका-यांसह पुन्हा साईटवर गेले. दरम्यान तिथे पांढऱ्या रंगाची आणि काळ्या बोनेट असलेली महिंद्रा मॅक्स पिकअप (नंबर प्लेट नसलेली) वाहनात दोन ते तीन चोरटे 1 ब्रास रेती (किंमत 7,000 रुपये) भरताना दिसले. घरमालक येताना पाहताच चोरट्यांनी वाहन तिथेच सोडून पळ काढला. वाहना सुमारे 1 ब्रास रेती होती.
प्रफुल्ल यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त केले व तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. बांधकामाचे साहित्य चोरी असल्याने घरमालकांची चिंता वाढली आहे.



Comments are closed.