वणीत 200 युनिट मोफत विजेसाठी संजय देरकर यांचे आंदोलन
शेतकरी विद्युत परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर यांनी रणशिंग फुंकले आहे. आज शुक्रवारी दिनांक 9 ऑगस्टला क्रांतीदिनाचे औचित्य साधून दुपारी छ. शिवाजी चौक येथे स्वाक्षरी अभियानाचा आरंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. मोफत वीज व वीजदराबाबत 1 लाख 11 हजार स्वाक्षरी गोळा करून या स्वाक्षरीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनही सादर करण्यात आले.
सध्या विजेच्या वाढलेल्या दरामुळे सर्वच त्रस्त झाले आहे. वणी परिसरात 5 हजार मेगावॅटची निर्मिती होते. यासाठी जमिन, कोळसा, पाणी हे परिसरातीलच वापरले जाते. मात्र परिसरातील लोकांनाच महाग दरात वीज खरेदी करावी लागते. सोबतच वीज निर्मितीमुळे परिसरात प्रदूषण पसरले आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला आहे. नुकतचं दिल्ली सरकारने 200 युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. याच धर्तीवर स्थानिक लोकांनाही 200 युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी या मागणीसाठी संजय देरकर यांनी शेतकरी विद्युत परिषदेद्वारा एल्गार पुकारला आहे.
दुपारी 1 वाजता वणीतील शिवतीर्थ परिसरात शेकडो कार्यकर्ते व शेतकरी गोळा झाले होते. यावेळी संजय देरकर यांनी उपस्थितांना विजेची समस्या तसेच मोफत स्थानिकांना मोफत वीज कशी दिली जाऊ शकते याविषयी माहिती दिली. तसेच वीजदर व मोफत विजेसंदर्भात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेसंदर्भात त्यांनी उपस्थितांना माहिती देऊन अधिकाधिक संख्येने या स्वाक्षरी अभियानात सामिल होण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना संजय देरकर म्हणाले की…
वीज निर्मितीसाठी जमीन, कोळसा, पाणी, मनुष्यबळ आमच्याच परिसरातले वापरले जाते. इथे तयार झालेली वीज बाजुच्या तेलंगाणा राज्याला विकली जाते. तिथेही महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहे. मग आम्हाला अवाजवी दरात वीज का खरेदी करावी लागते. खनिज निधीवर खरा हक्क भूमिपुत्रांचा आहे. असे असताना तो इतर ठिकाणी वापरला जातो. स्थानिकांना 200 युनिट वीज मोफत देऊन त्यातून होणारी तूट ही खनिज निधीतून सहज वळती केली जाऊ शकते. त्यामुळे मोफत वीज हे काही अशक्य गोष्ट नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी प्रा. लव्हाळे, राजू इदे, संतोष कुचनकर, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी वीजदरवाढ व मोफत वीज संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ईव्हीएम संदर्भात वणी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी अरुण ताजने, लतीफ खान, जगन जूनगरी, विठ्ठल बोढे, अभय मोघे, सुलेमान भाई, जितू नगराळे, प्रेमा धानोरकर, डॉ. पराशिवे, पारखी सर, गजानन दुर्गे, यांच्यासह शेतकरी विद्युत परिषदेचे कार्यकर्ते व संजय देरकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.