जितेन्द्र कोठारी, वणी: संपूर्ण राज्यात मटका जुगारावर प्रतिबंध आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सुद्धा जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही अशी ताकीद दिली आहे. परंतु वणी उपविभागाअंतर्गत शिरपूर पोलीस ठाण्यातील हद्दीत एसपींचे आदेश झुगारुन राजरोसपणे चारगाव व कायर येथे मटकापट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे. कायर येथील सुरू असलेल्या मटकापट्टीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
पोलीस स्टेशन पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चारगाव चौरस्ता (चौकी) येथे मटका सुरू आहे. हा मटका इतका राजरोसपणे सुरू आहे की हा ‘साहेबां’च्या आशीर्वादाने तर सुरू नाही? असा संशय कुणालाही येऊ शकतो. या ठिकाणी शिरपूर, पुनवट, नायगाव, वेळाबाई, खांदला, येथील मटका शौकीन दाव लावण्यासाठी येतात. तर वणी-मुकुटबन मार्गावरील कायर येथील मादगीपुरा येथे सुरू असलेल्या मटका अड्यावर कायरसह मोहदा, पुरड, नेरड, सिंदीवाढोणा, बाबापूर, डोंगरगाव, पठारपूर, महाकालपूर, दरा, साखरा इत्यादी गावातील मटकाबहाद्दर येउन आपले नसीब आजमवतात. कायर येथील मटकापट्टी व्यवसाय सुरु असल्याचा एक व्हिडीओसुद्दा व्हायरल झाला आहे.
शिरपूर पोलिसांच्या डोळ्यावर मटका ‘पट्टी’
शिरपूर पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर चारगाव चौकी वरील मटका पट्टी आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटण्याआधी तर एका बाजुला पोलिसांची चेक पोस्ट तर दुस-या बाजूला जवळ मटका पट्टी सुरू असल्याचे अनोखे चित्र दिसत होते. मात्र आता नाका बंद बंद झाला आहे. पण आता पोलीस ही दूर असल्याने मटका पट्टीला आणखीनच रंग चढला आहे. कायर येथील मटकापट्टी बाबतचा व्हि़डीओ देखील व्हायरल झाला आहे. मात्र इतके असतानाही शिरपूर पोलीस स्टेशन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून असलेले दिसत आहे.
या व्यतिरिक्त शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या आणखी काही गावात मटका पट्टी सुरू होती. मात्र जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या दरा-यामुळे मटकाचालकांनी आपले इतर बो-या बिस्तर इतर ठिकाणी शिफ्ट केल्याची माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या दोन्ही ठिकाणाहून महिन्याकाठी 2 लाख रुपयांचा हप्ता जात असल्याची खुमासदार चर्चा आहे.
कारवाई होणार का?
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अवैध धंद्याबाबत अनेकदा निवेदन आणि मीडियातून बातम्या आल्या आहेत. मात्र त्यावर शुन्य कारवाई असते. आता तर कायर येथील व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मटका शौकिन बाजारातील दुकानात जाऊन एखादी वस्तू विकत घ्यावी इतक्या सहजतेने अड्यावर जाऊन पट्टी फाडताना दिसत आहे. शिवाय हे काही आज काल सुरू झालेले नाही. मात्र डोळ्यावरच्या ‘पट्टी’ने या मटका पट्टीवर मात केल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्हयात शिरपूर पोलीस स्टेशन हे मलाईदार पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते. शिरपूर येथे बदली होण्याकरिता अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी चेक आणि जॅकचा वापर करीत असल्याचे सर्वश्रुत आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे समोर आले आहे. आता यावर काय कारवाई होते की इथे देखील ‘पट्टी’ बांधली जाते हे लवकरच कळेल.
लिंकवर व्हायरल झालेला व्हिडीओ….
हे देखील वाचा: