हिंदू मुलीला दत्तक घेऊन कन्यादान करणारे सत्तारमामू फुलवाले यांचे निधन

सामाजिक व धार्मिक सलोख्याचा धागा बळकट करणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याड

विवेक तोटेवार, वणी: सामाजिक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर राहिलेले सामाजिक कार्यकर्ते सत्तार मामू फुलवाले यांचे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. हैदराबाद येथे औषधी आणण्यासाठी गेलेल्या सत्तारमामू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता त्यांचे मूळ गाव हिंगणघाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

सत्तार खाँ इब्राहिम खाँ उर्फ सत्तारमामू हे वणी येथील काजीपुरा, एकता नगर येथे त्यांच्या पत्नीसह राहायचे. टिळक चौकात फुल विक्रीचा व्यवसाय होता. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि कायम मदतीला धावून जाण्याच्या सवयीमुळे त्यांना वणीकर ‘मामू’ नावाने संबोधायचे.  ते मूळचे हिंगनघाटचे होते. मात्र 25 वर्षांआधी ते व्यवसायासाठी वणीला आले व तिथेच स्थायिक झाले. 

गुरुवारी 13 ऑक्टोबर रोजी ते हैद्राबाद येथे आयुर्वेदिक औषध घेण्याकरिता गेले होते. मात्र तिथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना हैद्राबाद येथील प्रीमियम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सामाजिक सलोख्याचा धागा मजबूत करण्याचा वसा
सत्तारमामू हे फारसे सधन नसले तरी दानधर्मात ते कुठेही मागे नसायचे. आपल्या ऐपतीनुसार ते नेहमी अडीअडचणी असणा-यांच्या मदतीला धावून जायचे. शहरातील सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्यासाठी ते कायम अग्रेसर राहायचे. केवळ मुस्लिम सणच नाही तर रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी हिंदू सणांमध्येही ते हातभार लावून अन्नदान सारखे उपक्रम राबवायचे. कोरोना काळात मास्क वाटप, परिसर सॅनिटाइझ करणे, गरीबांना धान्य वाटप करणे असे अनेक उपक्रम राबविले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक छोट्या मोठ्या संस्थांनी त्यांचा सन्मानही केला होता.

हिंदू मुलीचे कन्यादान करणारे सत्तारमामू….
शहरातील अल मदतगार कमेटी ईजतेमाई शाही यांनी सत्तार मामूने 15 कुलर देण्याचे वचन दिले होते. ते पाळत त्यांनी काही दिवसांआधीच नागपूरला या कुलरची ऑर्डरही दिली होती. मात्र हे कार्य त्यांचे अपूर्णच राहिले. सत्तार मामू यांना अपत्य नव्हते. मात्र कोरोनामध्ये त्यांनी आईवडिल नसलेल्या एका मुलीला दत्तक घेत तिचे पालकत्व स्वीकारले होते. तसेच तिच्या लग्नाचा सर्व आर्थिक भार उचलत तिचे कन्यादानही त्यांनी केले होते. याची केवळ शहरातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. सत्तारमामू यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

लिंकवर क्लिक करून वाचा कन्यादानाची संपूर्ण स्टोरी़

अन् निकाताचे झाले सत्तार खाँ वडील… केले कन्यादान…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.