सावित्रीबाईंचा वसा दत्तक- पालक समिती चालवत आहे- आ. बोदकुरवार

दत्तक पालक योजनेअंतर्गत 325 मुलींना शैक्षणिक साहित्याचे वितरण

0

 

बहुगुणी डेस्क, वणी: येथील सावित्रीबाई फुले दत्तक पालक समिती मागील 18 वर्षांपासून निरंतरपणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागास मुली शैक्षणिक दृष्टीने समाज सहभागातून दत्तक घेऊन दत्तक पालक उपक्रम राबवित आहे.आधुनिक भारतातील मुलींना शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा घेऊन या समितीचे काम सुरू आहे. ही खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. असे प्रतिपादन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. ते या दत्तक पालक योजनेअंतर्गत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील 325 मुलींना वर्षभरासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

येथील एस.बी. लाँन मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, ठाणेदार वैभव जाधव, पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रा. महादेव खाडे, प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत मागील वर्षी 230 मुलींना दत्तक घेण्यात आले होते. यावर्षी दत्तक घेणाऱ्या पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या वर्षी 325 मुलींना शैक्षणिक दृष्टीने दत्तक घेऊन साहित्य वितरित करण्यात आले.

या प्रसंगी येथील उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे व पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी या नंतर या उपक्रमाशी नेहमीसाठी जुळून राहीन असा विश्वास उपस्थितांना देऊन वणीच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवाची साक्ष या कार्यक्रमातून दिसून येत असल्याचे स्पष्ट केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना नगराध्यक्ष बोर्डे म्हणाले की, एखादा उपक्रम सुरू करणे खूप सोपे आहे. पण त्यात सातत्य टिकवून ठेवणे कठीण काम आहे. ते सातत्य या समितीने टिकवून ठेवले याचा आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात सिंगापूर ला राहणारे अनिवासी भारतीय अजय पिंपळशेंडे यांनी 25 मुलींना दत्तक घेऊन या नंतर दरवषी या उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वस्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या समितीचे सदस्य लक्ष्मण इड्डे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन जयप्रकाश सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या समितीचे अध्यक्ष किशन खुंगर, उपाध्यक्ष चंद्रकांत फेरवानी, कोषाध्यक्ष हरेंद्र चौधरी, लक्ष्मण इड्डे, जयप्रकाश सूर्यवंशी , अशोक चटप यांनी अथक परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.