आरोग्य विभागाच्या कॅम्पमध्येच कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य हरपले

नाव, गाव सांगा आणि सर्टिफिकेट घेऊन जा

0

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे विविध राज्य, जिल्हे, गावात अडकून पडलेले प्रवासी, पर्यटक, मजूर, विद्यार्थी यांना परतण्यास शासनाने परवानगी दिली आहे. बाहेरगावी जाणासाठी आणि शहरात येणा-या प्रत्येकाने आपली संपूर्ण तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दोन दिवसांपासून शेतकरी मंदीरात कॅम्प लावला आहे. आज या कॅम्पचा तिसरा दिवस होता. मात्र इथे परप्रांतीय कामगार व नागरिकांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. रुग्णालयाच्या कामातच असा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने आरोग्य विभागाला कोरोना बाबत किती गांभीर्य आहे हे दिसून येत आहे. महत्त्वाचंं म्हणजे यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी किंवा ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक उपस्थित नसल्याने तिथे कोणाचा कोणाला ताळमेळ दिसून आला नाही.

कोविड १९ या विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्हयात अडकून असलेल्या ईतर जिल्हयातील किंवा राज्यातील नागरीकांना त्यांचे स्वगृही पाठविण्याकरीता व ईतर जिल्हयात किंवा राज्यात अडकून पडलेले नागरीक जिल्हयात अथवा तालुक्यात दाखल झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचा जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये तालुका आरोग्य अधिकारी विकास कांबळे यांनी 9 वैदयकीय अधिकारी व सहायकांचे वैद्यकीय पथक स्थापित केले. त्यांच्या 2 मे ते 13 मे पर्यत तीन गटात या कॅम्प मध्ये त्यांच्या ड्युटी लावुन दिल्या आहेत. परंतु आज मोठ्या प्रमाणात गर्दी होउन सुद्धा सकाळपासुन तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांनी या कॅम्प कडे साधे ढुंकुनही पाहीले नाही.

आरोग्य विभागाच्या कॅम्पमध्येच सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

उपस्थित वैद्यकीय चमूजवळ पीपीई कीट, ग्लव्ज, मास्क, सॅनिटायझर, ईत्यादी वस्तु पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी योग्यरित्या व्हावी याकरीता कमीत कमी थर्मल स्कँनर असणे प्रत्येक रूग्णालयात बंधनकारक असताना हजारो परप्रातियांना तपासण्यासाठी आरोग्य विभागाकडे एकही थर्मल स्कँनर नसणे ही गंभीर बाब आहे.

एकमेव थर्मल स्कॅनर सदोष
एक थर्मल स्कँनर आहे ते पण सदोष आहे. ते सर्वांचा तापमान 99 एवढेच दाखविते. एवढ्या मोठया कँम्प मध्ये काही गरोदर स्त्रीयासुद्धा आढळुन आल्यात. पण कोणालाही बरोबर तपासले जात नाही किंवा क्वांरटाईनचा सल्ला ही दिला जात नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्याचा प्रादुर्भाव वाढू नये याची खबरदारी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. यासाठीच कोरोना संदर्भात थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारन्टाईन कक्षात दाखल करुन ठेवले जात आहे. यासाठी काही शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र ई. ठिकाणी क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. परंतु वणी शहरात मागील ४५ दिवसांपासून एकही शाळा किंवा महाविद्यालयात क्वारंटाईन कक्ष स्थापन केलेला नाही.

 

आँनलाईन अर्जाचा तिढा कधी सुटणार ?
स्वगावी जाण्यापूर्वी मजुरांची तपासणी करणे व आँनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. कित्येक स्थलांतरित मजूर हे स्वत: ऑनलाइन अर्ज करु शकत नाही. मजुरांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत व्हावी यासाठी स्थानिक प्रशासनाने कॅम्प कार्यालये निर्माण केले नाहीत. त्यामुळे दररोज हे परप्रातींय शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे.

नगरपालिकेने सुरूवातीला दोन दीवस हे काम केले पण शासनाने पुन्हा आँनलाईनची साईट बदलविल्याने या सर्वाना पुन्हा आँनलाईन अर्ज करण्याचे सांगण्यात येते आहे. तहसील कार्यालयात तर मुख व्दारावर पोलिस बसवुन दिले आहे. सामान्य नागरिकांनी किंवा या परप्रातीयांनी आँनलाईन अर्ज भरावयाचे कुठे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिका-यांनीच आता सर्व बाबींकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आशा काळे मृत्यू प्रकरणाचे काय झाले?
आशा काळे यांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. त्या ग्रामीण रुग्णालयात गेल्या असता त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला होता. होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आल्यानंतर त्या रुग्णाची रोज वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे होते. मात्र त्यांची कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. परिणामी उपचाराअभावी त्यांना जीव गमवावा लागला. असा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या संपूर्ण प्रकाराला वैद्यकीय अधिक्षक जबाबदार असून त्यांच्यावर अद्यापही कार्यवाही का झाली नाही? असा सवाल आशा काळे यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.