विवेक तोटेवार, वणी: आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनला भीषण आग लागली. ही घटना संध्याकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी शाळेच्या तीन खोल्या जळून खाक झाल्यात व शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामन दलाने तात्काळ पोहोचून आग विझवली. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
वणीतील एसपीएम शाळेच्या मागे वामनघाट रोडवर नगरपालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक 3 आहे. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास परिसरातील काही लोकांना शाळेतून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ शाळेच्या कर्मचा-यांशी संपर्क साधला. कर्मचा-यांनी घटनास्थळी येऊन बघितले असता त्यांना शाळा जळत असताना आढळली. त्यांनी तातडीने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना कॉल करून याबाबत माहिती दिली.
नगराध्यक्षांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अर्ध्या तासाच्या आत संपूर्ण आग विझवली. मात्र तोपर्यंत शाळेच्या तीन खोल्या जळून खाक झाल्या होत्या. या आगीत शाळेतील टेबल, खुर्ची, टिनाच्या शेडचे सागवाणी फाटे, खिडक्या व शाळेचे छत जळाले. या दुर्घटनेत सुमारे 4 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली.
शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षीत
शाळेमध्ये मुलांच्या मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी लाकडे आणलेली होती. संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे या जळवणाने पेट घेतला. तिथून ही आग पसरत इतर खोल्यांपर्यत गेली. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहे. शाळेच्या बाहेर लाईट नसल्याने आग लागल्याची घटना उशिरा लक्षात आली. आगीत खोल्या जरी जळाल्या असल्या तरी यातून ऑफिसच्या खोली पर्यंत आग पोहोचण्याच्या आधीच आग विझवण्यात आली. त्यामुळे शाळेचे महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षीत राहिले. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका उमा राजगडकर यांनी दिली.
हे पण वाचा…
[…] शाळा क्रमांक 3 ला आग, तीन खोल्या जळून खा… […]