सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात
पाठ्यपुस्तकांच्या नियोजनासह शाळेसमोर अनेक आव्हानं
तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा 28 जून अर्थातच आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या भयगंडामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांविनाच शाळांचा श्रीगणेशा करावा लागणार आहे. गत पंधरा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेविषयी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाता येणार नसल्याने चिमुरड्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहेत.
दरवर्षी तालुक्यातील शाळा उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस सुरू होत असते. मात्र, कोरोनाच्या काळात शाळा बंद करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यावर्षीही विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरीत करण्याचे नियोजन शाळांना करावे लागणार आहे. तथापि, शाळांपर्यंत अजूनपर्यंत पुस्तके पोहोचले नाही.
शिक्षण विभागाकडून पुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याने जुन्या विद्यार्थ्यांची पुस्तके परत घेऊन नव्या वर्गाला वाटप केली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येतात. मात्र, यंदा अजूनही पुस्तके शाळांत पोहोचलेली नाहीत. परिणामी नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी नवीन पुस्तकांचे वाटप होणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली पुस्तके नव्या वर्गाला वाटप करण्याची नामुष्की शाळांवर ओढवणार आहे.
मागील वर्षी वाटप केलेली पुस्तके पूर्णपणे परत आलेली नाही. विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत येण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करणं शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी शिक्षकांना मोबाईलवर संपर्क साधून सर उद्या शाळेत यायचे का ? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
शिक्षकांनी चिमुरड्यांना सध्या तुम्ही नाही यायचे म्हणताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य दुःखात बदलत असल्याचे दिसून येते. एकीकडे निवडक विद्यार्थ्यांना शाळेची आस लागलेली आहे. मात्र, शाळेचा कंटाळा येणारे विद्यार्थी शाळाबंदमुळे खूष असल्याचे चित्र स्पष्ट आहे. शाळाबंद असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची असणारे अनेक विद्यार्थी छोट्या मोठ्या कामात गुंतले आहे. परिणामी अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना आपल्या कौशल्यांची बाजी लावावी लागणार आहेत.
हे देखील वाचा:
[…] सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासू… […]