बोगस लाभार्थ्यांनी लाटले शासनाचे कोट्यवधींचे अनुदान

तालुक्यातील 823 बोगस लाभार्थ्यांना रक्कम परत करण्याची नोटीस

0

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी असल्याची बतावणी करून अनेक नोकरदार, आयकरदाते तसेच लाभार्थी नसलेल्या बोगस लाभार्थ्यांनी शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतील 12 हजार वार्षिक अनुदानाची रक्कम लाटल्याचे निदर्शनास आले आहे. यात वणी तालुक्यातील 823 बोगस लाभार्थी असून प्रशासनातर्फे यांना लाटलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहे. ही परिस्थिती केवळ वणी तालुक्यापुरतीच मर्यादीत नाही तर झरी आणि मारेगाव तालक्यातही असे शेकडो बोगस लाभार्थी आढळले आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या नावावर रक्कम लाटणा-यांचे धाबे दणाणले आहे. शेतकऱ्यांनाही सन्मानाने जीवन जगता यावे, या करिता केंद्र शासनाने “पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना” अमलात आणली आहे. यात नोकरदार, करदाते, लोकप्रतिनिधी इ शेतकरी यांना वगळण्यात आले आहे. मात्र तालुक्यात अनेक बोगस लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

वणी तालुक्यातील 823 बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील तब्बल 68 लाख रुपये जमा झाली. आता या सर्व बोगस व बनावटी लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम एका महिन्याच्या आत शासन जमा करण्याची नोटीस वणी तहसीलदारांनी दिली आहे. नियोजित वेळेत रक्कम परत न केल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तहसीलदारांच्या नोटीसीने बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान नोटीस बजावल्यानंतर 17 ते 18 लाख रुपये शासनजमा झाल्याची माहिती नायब तहसीलदार महेश रामगुंडे यांनी वणी बहुगुणीला दिली.

वणी उपविभागातील मारेगांव व झरी तहसीलदारांनीही अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा बजावले आहे. मारेगाव तालुक्यातील 323 अपात्र लाभार्थ्यांकडून शेतकरी सन्मान योजनेतील 28 लाख पैकी 16 लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. तर झरी तालुक्यातील 417 अपात्र शेतकऱ्यांकडुन 28 लाख येणे पैकी 13 लाख वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही योजने अंतर्गत अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांची ओळख पटवून याद्या तयार करण्यात आल्या. योजनेसाठी गावस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक व सहकारी समित्यांचे सचिव असे कार्य करीत होते. त्यावेळी त्यांनी योजनेचे निकष लक्षात न घेता सरसकट शेतकऱ्यांची यादी बनविली. नोकरदार व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे हा सर्व घोळ झाल्याचे आरोप शेतकरी करीत आहे.

शासनाच्या इतर योजनेप्रमाणे या योजनेलाही भ्रष्टाचाराचे कीड लागल्याचे उघड झाले आहे. बोगस लाभार्थ्यांना नोटीस आल्याने आता त्यांचे धाबे दणालले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या निकष व उद्देशची पायमल्ली करून खऱ्या लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहे.

हे पण वाचा…

गप्पा टप्पा: खडकांशी आणि डायनासोरशी बोलणारा शास्त्रज्ञ

हे पण वाचा…

आज वणी परिसरात 9 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.