गप्पा टप्पा: खडकांशी आणि डायनासोरशी बोलणारा शास्त्रज्ञ

दिवसा पर्यावरण तज्ज्ञ, रात्री खगोल शास्त्रज्ञ

0

अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन, इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान अशा जवळपास 80 देशांतील अभ्यासक व तज्ज्ञ त्यांच्या आजही संपर्कात असतात. भूगोल, पर्यावरण, विज्ञान, खगोलशास्त्र, भूशास्त्र, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, साहित्य व सांस्कृतिक विषयांवर त्यांच्यासोबत जगभरातील लोक चर्चा करतात. वणी तालुक्यातील वेळाबाई, सावर्ला या गावांतून मोठी झालेली ही व्यक्ती सध्या चंद्रपूर येथील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात चंद्रपूर येथे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. रेशिफेमान्टो इंटरनॅशनलच्या इंटरनॅशनल मिलेनियम पर्सनॅलिटी अवार्ड पासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. भारतातील सर्वात प्रदूषीत शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर परिसरात 10 हजारांच्या वर वृक्षरोपण करणरे वणीचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बहुपैलू व्यक्तिमत्त्व प्रा. सुरेश चोपणे यांची मुलाखत घेतली कवी, निवेदक व गीतकार सुनील इंदुवामन ठाकरे यांनी.

सुनील इंदुवामन ठाकरे: खगोल, भूगोल व पर्यावरणाकडे कसे वळले?
प्रा. सुरेश चोपणे: माझा जन्म वणी तालुक्यातील सावर्ला येथे झाला. स्वाभाविकतः लहानपण खेड्यातच गेलं. त्यामुळे भूगोल आणि पर्यावरणाशी थेट संबंध लहानपणापासूनच आला. फिरायला मोकळा परिसर होता. त्यामुळे शाळा झाल्यावर आणि सुटीच्या दिवशी निवांत भटकायचो. नदी, नाले व जंगली भाग माझा अत्यंत आवडता. आजही ती सवय कायम आहे. आपला संपूर्ण परिसर जैवविविधतेने नटला आहे. वेगवेगळ्या रंगांचे खडक, कीटक मी गोळा करायचो. वेगवेगळे पक्षी व प्राणी पाहायचो. त्यावर विचार करायचो. कीटकांची माहिती मिळायची. पण खडकांची माहिती कोणालाच नसायची. प्रत्येकजण आपापल्या परीने उत्तरे द्यायचा. त्यात माझे वडील शिक्षक व ग्रामसेवक होते. त्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बदल्या होत असत. वेगवेगळा परिसर अनुभवायला मिळायचा.

माझे वडील मारोतराव चोपणे 85 वर्षांचे आहेत. आध्यात्मिक व सामाजिक वारसा त्यांना लाभला आहे. याही वयात ते वृ़द्धाश्रम व विविध ठिकाणी ते आपली सेवा देतात. पूर्वीच्या काळात पंखे, कूलर फार कमी वापरयाचे. त्यापेक्षा मोकळ्या आकाशाखाली झोपणं अधिक पसंत केलं जायचं. रात्री तारकांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपणं हा उन्हाळ्यातला नित्याचाच भाग होता. डोळ्यांनी दिसणारं आकाश मग मी जाणीवपूर्वक पाहू लागलो. त्याचं कॅल्क्युलेशन करू लागलो. आणि जमिनीसोबतच आकाशाचंही वेड लागायला सुरुवात झाली. त्यामुळे जिज्ञासा वाढत राहिली. मुळातच मला लहानपणापासून भूगोल आणि पर्यावरणाचं आकर्षण राहिलं. अशा आकर्षणातूनच या दिशेने मी माझी वाटचाल सुरू ठेवली.

सुनील इंदुवामन ठाकरे: प्रत्यक्ष कार्याला सुरूवात कधी झाली?
प्रा. सुरेश चोपणे: वाईल्ड लाईफ आणि पर्यावरणाची आवड होतीच. त्यात 1986 ला वृक्षमित्र संघटनेची स्थापना केली. काही लोकांना या चळवळीशी जोडलं. पुढे चालून 1993ला चंद्रपूर येथे एक संस्था सुरू केली. ‘ग्रीन प्लॅनेट’ या संस्थेतून माझ्यासह 50 स्वयंसेवक प्रत्यक्ष तर हजारो स्वयंसेवक अप्रत्यक्ष कार्य करीत आहेत. महाराष्ट्रभर माझे सहकारी पर्यावरणावर काम करतात.

सुनील इंदुवामन ठाकरे: साहित्य व कवितेच्या प्रांतात कसे आलात?
प्रा. सुरेश चोपणे: निसर्ग आणि कविता वेगळ्या करता येत नाहीत. साहित्याचा अभ्यासक होतो. निसर्गाचं वेड होतं. त्यातूनच कवी झालो. माझा ‘‘युनिव्हर्स’’ हा इंग्रजी कवितासंग्रह आणि ‘‘निसर्गाकडे परतू या’’ हे निसर्गावर दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पाच पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अनेक टिव्ही चॅनल्स व रेडिओंवर मुलाखती झाल्यात. शेकडो लेख प्रकाशित झालेत. तसेच अजूनही लेखन सुरूच आहे.

सुनील इंदुवामन ठाकरे: आदिमानवांचा अवजारांचा कारखाना वणी-चंद्रपूर परिसरात होता असं तुम्ही म्हणता?
प्रा. सुरेश चोपणे: या परिसरात आदिमानवांची वस्ती हेाती. एवढंच नव्हे तर त्यांच्या अवजारांचा कारखानादेखील या परिसरात होता. आदिमानवांचे पूर्ण तयार झालेले अवजार. त्यांचे निर्मिती अवस्थेतील अवजार. ही अवजारे तयार करण्याची साधने या परिसरात सापडलीत. माझ्या संग्रहालयात आपल्याला ते पाहायला मिळतील.

सुनील इंदुवामन ठाकरे: जीवाष्म आणि डायनासोरचे अवशेषांबद्दल काय सांगाल?
प्रा. सुरेश चोपणे: मला कळलं की चंद्रपूर जिल्ह्यात जीवाष्म आणि डायनासोरचे अवशेष आहेत. तेव्हा मी त्याचा शोध घेण्याचं ठरलं. पुरेशी साधनं नव्हती. प्रचंड धडपड करावी लागली. एकेक धागा हाती गवसू लागला. स्ट्रोमॅटोलाईट हे अमिबाच्याही आधीचे पहिले सूक्ष्म जीव. त्यांचे अवशेष सापडले. उत्साह वाढायला लागला. कधी गाडीने, कधी सायकल तर कधी पायीच ही शोधमोहीम सुरू ठेवली. आज जीवाश्मांचं व डायनासोरच्या अवशेषांचं चांगलं कलेक्शन माझ्याकडे आहे. 15 जीवाश्मस्थळे व 15 अश्मयुगीन स्थळे मी शोधलीत. अनेक अभ्यासू माझं संग्रहालय पाहायला येतात. वैज्ञानिक व्हायचं लहानपणीचं स्वप्न होतं. त्यासाठी मी सायन्सदेखील घेतलं होतं. साधनांच्या अभावी ते पूर्ण होऊ शकलं नव्हतं. नंतर आर्टस् घेतलं; पण संशोधनवृत्ती व जिज्ञासा बालपणापासूनच असल्याने तो व्यासंग मी आता जपतो.

सुनील इंदुवामन ठाकरे: काय काय आहे तुमच्या अश्म संग्रहालयात?
प्रा. सुरेश चोपणे: माझ्या संग्रहालयाचे तीन विभाग आहेत. पहिला अश्मविभाग दुसरा जीवाश्म विभाग तर तिसरा अश्मयुगीन अवजारे विभाग. अश्मविभागत 250 ते 2 कोटी वर्षांची अश्मे आहेत. त्यात अग्नीज, रूपांतरीत व स्तरीत अश्मे, धातू व खनिजे, खडकांचे प्रकार, अश्म, परग्रहावर आढळणारे अश्म व उल्का आहेत. जीवाश्म विभागात 20 ते 6 कोटी वर्षांदरम्यानची जीवाश्मे आहेत. यात समुद्री जीवाश्मे, डायनासोरसांची अंडी, हाडे, दात, विष्ठा, शंख, शिंपले तथा वृक्ष, पाने व कोळशातील जीवाश्मे आहेत. अश्मयुगीन अवजार विभागात 2 लाख ते 4 हजार वर्षांदरम्यानची अवजारे आहेत. पुराश्मयुगीन, मध्ययुगीन, नवाश्मयुगीन अवजार माझ्या म्युझियममध्ये पाहायला मिळतील. प्रार्गतिहासिक तसेच यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अवजारांचाही उत्तम संग्रह माझ्याकडे आहे. आकाशातील ग्रह व तारे पाहण्यााठीची एक दुबीणदेखील आहे. 2011 पासून मी ते म्युझियम लोकांसाठी मुक्त केले आहे. नाममात्र शुल्क मी त्यासाठी ठेवले आहे. जगभरातून पर्यटक, विद्यार्थी भेटीसाठी येत असतात.

सुनील इंदुवामन ठाकरे: हरहुन्नरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला पाहिला की येतो !
प्रा. सुरेश चोपणे: मला सगळंच माहीत असलं पाहिजे हा माझा लहानपणापासूनचा प्रयत्न होता. त्यासाठी खूप वाचन करायचो. धडपड करायचो. अनेक तज्ज्ञांना सातत्याने विचारायचो. आवड व गरज म्हणून फोटोग्राफी सुरू झाली. शिक्षक तर होतोच त्यात वकीलीची पदवीही घेतली. कविता शिकवता शिकवता व आवडीतून कवीदेखील झालो. लोकांना हा बहुमोल खजिना वाटता वाटता वक्ता व लेखकही झालो.

सुनील इंदुवामन ठाकरे: पत्रकारितेची कारकीर्द कशी राहिली?
प्रा. सुरेश चोपणे: समाजातील घडामोडीवर आपले मत व भाष्य मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पत्रकारिता. समाजातील अनेक वाईट गोष्टी मला खटकत होत्या. त्यावरती आवाज उठवावा असे वाटले आणि पत्रकारितेत प्रवेश घेतला. 1984 ला नागपूर टाईम्स, 1992 ला जनवाद, साप्ताहिक मुक्त ललकार, चंद्रपूरला लोकमत टाईम्स, नागपूर टाईम्स, मतदार, महाविदर्भ अशा वर्तमानपत्रांसाठी काम केलं. पर्यावरण, विकास, शेती, आरोग्य असे अनेक विषय मी हाताळले. माझ्या बातम्यांवर विधानसभेतही चर्चा व्हायच्या. अजूनही मी मुक्तलेखन अनेक वर्तमानपत्र व नियतकालिकांसाठी करीतच असतो. आज संपूर्ण देशातून अनेक पत्रकार माझ्या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या काही शंका असल्यास मला प्रश्न विचारतात. मी माझ्यापरीने त्यांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो.

सुनील इंदुवामन ठाकरे: नवीन काय लिहायला हाती घेतलं?
प्रा. सुरेश चोपणे: सृष्टीच्या आरंभापासूनचा प्रवास लिहायला घेतलाय. सृष्टीचा अंत कसा होईल वगैरे अनेक विषय त्यात आहेत. त्यासाठी अभ्यास, निरीक्षण, वाचन, संशोधन व भ्रमंती सुरूच आहे. आजही दर शनिवार-रविवारी बॅग घेऊन भटकायला निघतोच.

सुनील इंदुवामन ठाकरे: नव्या पिढीला काय सांगाल?
प्रा. सुरेश चोपणे: वाचनाशिवाय गत्यंतर नाही. जग ज्ञानाचं भांडार आहे. आपल्याला सगळंच माहीत असलं पाहिजे ही वृत्ती ठेवावी. त्यासाठी भरपूर वाचन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची जिज्ञासूवृत्तीनं चिकित्सा केली पाहिजे. वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची संपूर्ण लायब्ररी माझ्यासाठी आरंभिक ज्ञानस्रोत राहिलं. अत्यंत प्रशस्त व विविध विषयांवर इथे पुस्तके आहेत. मी माझं सगळ्यात जास्त वाचन इथेच केलं आहे. नव्या पिढीने ज्ञानप्राप्तीच्या कक्षा वाढवाव्यात एवढंच म्हणावंसं वाटतं. निसर्ग ही एक मोठी कार्यशाळा आहे. त्यात रमलं की बरंच काही जगण्याचं ज्ञान मिळतं.

सुनील इंदुवामन ठाकरे: पर्यावरण रक्षणासाठी आपण आंदोलनेही केलीत?
प्रा. सुरेश चोपणे: जे काम माझ्या पातळीवर शक्य होईल ते ते करीत आलो. चंद्रपूर रेल्वेलाईनच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडं लावलीत. वणीतील कोलडस्ट, अवैध कोलडेपो या विषयांसाठी तक्रारी व आंदोलने केलीत. 1986 पासून पर्यावरण जनजागृतीवर कार्य करीतच आहे. 1995 पासून विज्ञानप्रसाराचे कार्य सुरू आहे. 1997 पासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे व 2002 पासून चंद्रपूर येथील प्रदूषणावर काम सुरू आहे. 2008-09 ला लोहार येथे येणा-या अदाणी खाणीविरोधातील लढ्याची व जनआंदोलनाची तर ऑस्ट्रेलियाने दखल घेतली. तेथील अशाच समस्येच्या अनुषंगाने मला तिथून निंमत्रणदेखील आलं होतं. ताडोबातील वाघ वाचविण्यासाठीदेखील आंदोलने सुरूच असतात. चंद्रपूर-वणीतील पर्यावरणाचा प्रश्न हा स्थानिक राहिला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदूषणासाठी चंद्रपूरचं नाव येतं हे आमचं दुर्दैवच. अनेक वर्षांपासून माझे यावर काम व लढा सुरूच आहे. नवीन लोक जुळत आहेत.

सुनील इंदुवामन ठाकरे: तुमच्या कार्यामुळे तुमच्या जागतिक संवादाच्या कक्षा वाढल्यात ?
प्रा. सुरेश चोपणे: नक्कीच वाढल्या आहेत. आज सोशल मीडियामुळे ते काम अधिक सोपं झालं आहे. पण त्याही आधीपासून अनेक देशातील पर्यावरण, भूगोल व खगोल आदी विषयांचे अभ्यासक माझ्याशी विविध माध्यमांतून संवाद साधत. पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन, इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया असे जवळपास 80 देशांतील अभ्यासक व तज्ज्ञ माझ्या नियमित संपर्कात असतात.

सुनील इंदुवामन ठाकरे: एवढं सगळं केल्यावर आता पुढे काय करायचा बेत आहे ?
प्रा. सुरेश चोपणे: मी तर म्हणतो की विश्वाचा आवाका एवढा मोठा आहे की, तीस-चाळीस वर्षांचं कार्य म्हणजे सुरूवातदेखील म्हणता येणार नाही. मंगळावर जीवन आहे काय? सूर्यावरील डागांचा पृथ्वीवरील भूकंप व वादळांशी काय संबंध आहे, पाषाणयूग, डायनासोअर, पक्षिजीवन अशा अनेक कार्यांवर मला संशोधन व कार्य करायचे आहे.

संपर्क: 
प्रा. सुरेश मारोतराव चोपणे
गणेशनगर, सिव्हील लाईन्स, क्राईस्ट हॉस्पिटल रोड, तुकूम, चंद्रपूर
मोबा.: 9822364473
ईमेल: [email protected]

प्रा. सुरेश चोपणे जुळलेल्या संस्था
1. अध्यक्ष – ग्रीन प्लानेट सोसायटी विदर्भ,
2. अध्यक्ष – स्काय वॉच गृप इंडिया
3. संस्थापक- चंद्रपूर बचाव संघष्र समिती
5. संचालक – सुरेश चोपणे अश्म संग्रहालय, चंद्रपूर

आजीव सदस्य
1 . भारतीय हौशी खगोल संस्था दिल्ली
2. आंतरराष्ट्रीय विज्ञान लेखक संस्था, मुंबई,
3. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कोलकाता
4. मराठी विज्ञान परिषद, मुंबई
5. इतिहास संकलन समिती, दिल्ली
6. पीपल फॉर अॅनिमल्स, (मनेका गंाधी), दिल्ली
7. विदर्भ साहित्य संघ, नागपूर
8. वन व वन्यजीव संस्था, चंद्रपूर
9. पक्षिमित्र संघटना
10. चंद्रपूर सायकल क्लब

प्रशासकीय सदस्य
1. क्षेत्रिय सशक्त समिती – केंद्रीय वने, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालय, दिल्ली
2. ताडोबा टायगर कन्झर्वेशन प्लान (वनविभाग, चंद्रपूर)
3. चंद्रपूर प्रदूषण कृती आराखडा, (जिल्हा प्रशासन, निरी, नागपूर)
4. रेल्वे सुधार समिती

तज्ज्ञ मार्गदर्शक:
1. राष्ट्रीय हरीत सेना, महाराष्ट्र (शासकीय)
2. पर्यावरण शिक्षण शिक्ष प्रशिक्षक (शासकीय)
3. मराठी विज्ञान परिषद
4. राज्य विज्ञान संस्था, नागपूर (शासकीय)

पुरस्कार

1. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, मानव संसाधन मंत्रालय, दिल्ली
2. इंटरनॅशनल मिलेनियम पर्सनॅलिटी अवार्ड, दिल्ली (रेशिफेमान्टो इंटरनॅशनल)
3. राइजिंग पर्सनॅलिटी अवार्ड
4. लाईफटाईम एज्युकेशन अवार्ड
5. एअर इंडियाचा पर्यावरण पुरस्कार
6. म.वि.प.चा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार
7. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन पुरस्कार
8. म.वि.प.चा विज्ञानमित्र पुरस्कार
9. पर्यावरण मित्र पुरस्कार
10 जीवाश्मतज्ज्ञ पुरस्कार

Leave A Reply

Your email address will not be published.