विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला- साखरा- मुंगोली मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर मार्गाने सुरू असलेली चंद्रपूर ते मुकुटबन बस सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे सामान्य प्रवाशांसह विध्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. म्हणून सदर मार्गाची वेकोली प्रशासनाने त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वणी उपविभागीय अधिकारी यांना २७ ऑगस्टला निवेदनाद्वारे केली आहे.
शिंदोला ते मुंगोली हा मार्ग वेकोली परीक्षेत्राच्या अधिनस्त येतो. सदर मार्गाने परिसरातील खाणीतून उत्खनन केलेल्या कोळशाची वाहतूक केल्या जाते. त्यामुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. वर्धा नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. मात्र वेकोली प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर मार्गाच्या दुरवस्थेमुळे शिंदोला मार्गे धावणारी चंद्रपूर ते मुकुटबन बस सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे घुगूस, चंद्रपूर येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रस्ता दुरूस्तीची मागणी करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी शिरपूर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. मात्र वेकोली प्रशासनाला जाग आली नाही.
वेकोली प्रशासनाने ५ सप्टेंबर पर्यंत सदर रस्त्याची डागडुजी करून रस्ता वाहतुकी योग्य करावा. अन्यथा शिवसेना कार्यकर्ते पिडीत विद्यार्थी, नागरिकांसह आंदोलन करून वेकोलीतील दळणवळण सेवा पूर्णतः बंद पाडेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती वेकोलीसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास, गणपत लेडांगे, ललीत लांजेवार, सुधीर थेरे, शशिकांत नक्षीने यांच्या स्वाक्षऱ्या आहे.