सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः शहरात ठिकठिकाणी उमरेडचे बहुगुणी शिंगाडे विक्रीसाठी आलेत. तसे पाहता वणी आणि मुकुटबनचे शिंगाडे परिसरात फेमस आहेत. वणीतला मोठा तलाव हा शिंगाडा तलाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. तरीदेखील गाळामुळे तिथलं शिंगाडा उत्पादन सध्या बंद आहे.
वणी आणि मुकुटबनचे शिंगाडे हे संपूर्ण विदर्भासह बाहेरही जातात. तरीदेखील उमरेडचे शिंगाडे वणीत मागवले जात आहेत. उमरेडला तसे तीन तलाव आहेत. हिरवा तलाव आणि गांधीसागर ही त्यांची नावे. किल्याच्या खाली पाणी साचतं. त्याला बोडी म्हणतात. तिथेही शिंगाडा उत्पादन घेतलं जातं. या तलावांचं टेंडर दिलं जातं. उमरेड येथील कलावतं संजय गायकवाड यांनी ही माहिती दिली.
वणीच्या तलावातलं शिंगाडा उत्पादन सध्या बंद आहे. इथे साचलेला गाळ हेच त्याचं मुख्य कारण आहे. स्थानिक प्रशासनाकडून तलावाचं दोन मीटर खोलीकरणाचे काम होणार आहे. तसेच रनिंगसाठी दोन मीटरचा ट्रॅकदेखील इथे होणार आहे.
शिंगाड्याचे शास्त्रीय नाव ट्रॅपा नॅटस आहे. त्याला वॉटर चेस्टनट असेही म्हणतात. त्याचे देठ हे दीड मीटरपर्यंत वाढते. त्याचे कंददेखील काही भागात खातात. शिंगाडा अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. उत्तर भारत, मध्यप्रदेश आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शिंगाड्यांचं उत्पादन घेतलं जातं.
शिंगाड्यात आयोडीनचं प्रमाण जास्त असतं. षिंगाडे उपासाच्या पदार्थात वापरले जातात. ते कच्चे, भाजून किंवा उकळून खातात. विदेशात ते विविध खाद्य पदार्थांमध्येदेखील वापरतात. शिंगाडे ताप आणि दातांच्या विकारांवर गुणकारी ठरतात. भुकेच्या समस्याही शिंगाड्याने दूर होतात. शिंगाड्याचे मात्र योग्य मात्रेतच सेवन करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
झरी तालुक्यातील मुकुटबन हे शिंगाड्याचं उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. तेथील पत्रकार सुशील ओझा म्हणालेत, की पूर्वीपेक्षा तलावांची रुंदी आता कमी झाली आहे. इथले शिंगाडे हे अमरावती, नागपूर पासून सर्व विदर्भात जातात. अगदी ट्रकच्या ट्रक शिंगाडे पूर्ण महाराष्ट्रभर जातात.
मुकुटमनपाठोपाठ शिरपूर येथीलही शिंगाडे प्रसिद्ध आहे. कैलास शिखर देवस्थानच्या पायथ्याशी मोठा तलाव आहे. दरवर्षी शिंगाड्यांचं मोठ्याप्रमाणात उत्पादन होत असल्याचं डॉ. धीरज डाहुले यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सांगितलं.
श्रावण पौर्णिमेपासून मासेमारी सुरू होते. त्यानंतर शिंगाड्यांचं पीक घेतलं जातं. मुकुटबन आणि वणी शिंगाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लवकरच सर्वच ठिकाणांहून शिंगाडे मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. वणी परिसरातील बहुगुणी शिंगाड्यांची रसिक चवीने वाट पाहत असतात.