शिरपूर-कोरपना मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकाची वानवा
नवीन प्रवाशांना अडचण; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील शिरपूर-कोरपना, वेळाबाई फाटा – पूरड या दोन अत्यंत वर्दळीच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकांची वानवा आहे. त्यामुळे नवीन व्यक्तींची चांगलीच पंचाईत होत आहे. या मार्गावर अवघे दोन तीन ठिकाणच माईल स्टोन आहेत. परिणामी अंतर, वळण मार्ग, दिशानिर्देश योग्यरीत्या होत नाही. नवीन व्यक्ती या मार्गावर प्रवास करीत असल्यास त्याला रस्त्यावर थांबून विचारण्याखेरीज पर्याय नाही. रात्रीच्या वेळी तर ही स्थिती अधिकच गंभीर बनते.
शिरपूर -कोरपना मार्गावर चारगाव चौकी , आबई फाटा, वेळाबाई फाटा, गोवारी पारडी फाटा, बोरी फाटा, नदी पुल व वेळाबाई – पूरड मार्गावर कृष्णानपूर फाटा, मोहदा, वेळाबाई, वेळाबाई फाटा या किमान मुख्य स्थानावर तरी अंतर व गावांचे दिशा निर्देशन फलक आवश्यक आहे. परंतु यासंबंधी अनेकदा लक्ष वेधून ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लालगुडा फाट्यावर ही घुग्घुस, चंद्रपूर व्यतिरिक्त शिरपूर, कोरपना, गडचांदूर आदी मार्गाचे दिशानिर्देशन केले नसल्याने नवीन व्यक्तींना या गावाकडे जाणारा मार्ग कोणता हे सुद्धा कळतं नाही. त्यामुळे त्यांची बरेचदा फसगत होत आहे. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन फलकांची उभारणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा: