लोककल्याणाची खरी गॅरन्टी छत्रपतींनीच दिली- नंदकुमार बुटे

शिवजयंती आयोजकांच्या सत्कार समारंभात प्रतिपादन

विवेक तोटेवार, वणी: आजकाल गॅरन्टीचा सर्वच माध्यमांत धुमाकूळ सुरू आहे. मात्र इतिहासात खरी गॅरन्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. स्वराज्य आणि लोककल्याण करून त्यांनी ती पूर्ण करून दाखवली. आजकाल कोणीही गॅरन्टी ह्या शब्दाचा वापर करतात.पण तो प्रचाराकरिता आणि लोकांना भ्रमित करण्याकरिता आहे.खरं तर चारशे वर्षापुर्वी शिवाजी महाराजांनी शेतकरी वर्गाला, स्त्रियांना, सामान्य माणसाला लोककल्याणाची गॅरन्टी दिली होती.ती गॅरण्टी स्वराज्याच्या राज्यकारभारातून दिसत होती.आत्ताची गॅरन्टी ही फसवी आणि निव्वळ प्रचारकी आहे.असा मार्मिक संदेश सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक आणि वक्ते नंदकुमार बुटे यांनी वणी येथे झालेल्या व्याख्यानात दिला.

मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेड -जिजाऊ ब्रिगेड वणी, मारेगाव, झरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या  शिवजयंती आयोजकांच्या गौरव सोहळ्यात त्यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना वरील भाष्य केले. गणित विषयात आपण अनेक कोण शिकतो. परंतु आपले कोण? हे शिकविणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय. शिवजयंतीचे आयोजन हे अस्मिता,स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतिक आहे. त्यामुळे हे आयोजन शिवचरित्राला अनुरूप असू द्यावे. तेव्हाच समाज तुमचा आदर करेल.अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मराठी भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टिने महाराजांनी त्या काळात लंडनहून छपाई यंत्र बोलाविले होते. महाराजांची दुरदृष्टी यातून दिसते. स्वराज्याच्या शत्रुंविरूद्ध महाराजांनी वेळोवेळी मानसशास्त्राचा प्रभावी वापर केला. सोबतच आज ज्या कृत्रिम बुद्धीमत्तेची चर्चा सर्वत्र आहे. ती बुद्धीमत्ता महाराजांनी आग्रा सुटका, पन्हाळ्याचा वेढा इत्यादी प्रसंगात वापरली. म्हणूनच चारशे वर्षानंतरही जगात केवळ शिवजयंती साजरी होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

स्थानिक कुणबी समाज सांस्कृतिक भवन येथे संत तुकाराम महाराज स्मृतिदिनानिमीत्य झालेल्या या सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर यांनी केले. स्वागतपर मनोगत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी व्यक्त केले. या वेळी तिन्ही तालुक्यांतील ३१ आयोजक मंडळांचा गौरव सन्मानचिन्ह आणि ” शिवरायांची खंत ” हे पुस्तक देऊन करण्यात आला. या वेळी अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे वणी, मारेगांव, झरीचे तालुकाध्यक्ष अनुक्रमे अंबादास वागदरकर, ज्योतिबा पोटे, केतन ठाकरे सोबतच जिजाऊ ब्रिगेड वणीच्या अध्यक्ष भारती राजपूत, मारेगाव अध्यक्ष लीना पोटे, उद्योजक नितेश ठाकरे, अश्वीनी चांदणे उपस्थित होत्या.
      
संत तुकोबाराय, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय यांना अभिवादन करून व सामूहिक जिजाऊवंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक मनोगत अमोल टोगे, सुत्रसंचालन आशीष रिंगोले, वसंत थेटे तर उपस्थितांचे आभार संदीप आसुटकार यांनी मानले.मान्यवरांचे स्वागत मारोती जिवतोडे, जानु अजाणी, अनामिक बोढे, सरिता घागे, सीमा डोहे, विजय खाडे, आशीष झाडे, देव येवले, प्रफुल्ल चौधरी, नरेश मुरस्कर, अमोल बावने यांनी ग्रंथरूपाने केले. संपूर्ण कार्यक्रमाकरिता मराठा सेवा संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांसह सुरेन्द्र घागे, भाऊसाहेब आसुटकार, दत्ता डोहे, विनोद बोबडे, संजय गोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.