जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये काल 2 कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. यात आज पुन्हा एका रुग्णाची भर पडली. त्यामुळे वणीकरांसोबतच प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शनिवारी रात्री 11 जणांना व आज दुपारी 19 जणांना अशा एकून 30 जणांना कॉरेन्टाईन केले आहे. हे कॉरेन्टाईन 2 रुग्णांच्या साखळीवरून करण्यात आले. मात्र आता तिसरा रुग्ण आढळल्याने तिस-या रुग्णाची साखळी वाढून कॉरेन्टाईन व्यक्तींची संख्या वाढू शकते. आतापर्यंत 15 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून इतर 15 जणांचे स्वॅबही लवकरच तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान तिस-या पॉजिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या त्यांना ट्रेस करण्यात येत असून ज्या व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी स्वतःहून संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तिसऱ्या रुग्णाबाबत आरोग्य सेतूने शिक्कामोर्तब केले असले तरीही प्रशासनातर्फे अद्यापही याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 जून रोजी मुंबईहून एक कुटुंब वणीला आले होते. एका आठवड्यानंतर त्यातील दोघांना कोरोना सदृष्य लक्षणं आढळल्याने त्यांनी व त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील आणखी दोन सदस्यांनी खबरदारी म्हणून नागपूर येथे कोरोनाची टेस्ट केली. त्यात काल 2 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आणखी दोन जणांचे रिपोर्ट आले. त्यात एक व्यक्ती पॉजिटिव्ह तर दुसरा व्यक्ती निगेटिव्ह असल्याची माहिती आहे. मात्र खबरदारी म्हणून निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
वणीतील 30 व्यक्ती कॉरेन्टाईन
वणीत दोन रुग्ण सापडताच प्रशासनाने तातडीने पावलं उचलत रात्रीच्या रात्री हाय रिस्क असणा-या 11 जणांना परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले. दुपारी दोन रुग्णाच्या साखळीनुसार 30 जणांना कॉरेन्टाईन करण्यात आले तर आता आणखी एक रुग्ण सापडल्याने या रुग्णाच्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्यात त्यांना हाय रिस्क म्हणूनच कॉरेन्टाईन केले जाणार आहे. तसेच तिसरा रुग्ण सापडताच ज्या दोन व्यक्तींना होम कॉरेन्टाईन केले होते. त्यांनाही कोविड केअर सेंटरमध्ये कॉरेन्टाईन करण्यात आले. तिसरा रुग्ण सापडल्याने कॉरेन्टाईनचा आकडा मोठा असू शकतो.
तिस-याने वाढवली चिंता….
आधी ज्या व्यक्तींंचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेत त्या व्यक्ती मुंबईहून आल्या होत्या. मात्र तिसरी पॉजिटिव्ह व्यक्ती ही वणीतील आहे. ही व्यक्ती व्यवसाय, मित्रपरिवार व इतर कार्यामुळे वणीकरांच्या नेहमी संपर्कात असते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात व्यवसायानिमित्त येणा-या व्यक्ती, कर्मचारी व मित्रपरिवार यांच्यात घबराट निर्माण झाली आहे. यात ग्रामीण भागातील व्यक्तींचाही समावेश आहे. त्यामुळे वणीकराच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
दरम्यान वणी व परिसरात दिवसभर कोरोनाविषयीच्या चर्चेला उधाण आले होते. याबाबत विविध तर्कवितर्क याबाबत लावले जात होते. कोण कुणाच्या संपर्कात आले याबाबत फोनवरून विचारपूस सुरू होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून वणीत कोरोनाचा रुग्ण नसल्याने निश्चिंत झालेले वणीकर आता आणखीनच अलर्ट झाले. वणीकर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत होते. लोकांच्या चेह-यावर गायब झालेला मास्क पुन्हा चेह-यावर दिसू लागला. शिवाय अनेकांनी रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर घराबाहेर पडणेही टाळले.
हा आहे कन्टेन्मेन्ट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र)
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. यात वार्ड क्रमांक 3 साई दरबार परिसर व शांती पार्क परिसर याचा समावेश आहे. यात पूर्व भाग कृषी उत्पन्न बाजारसमिती सीमा, डीपी रोड, पश्चिम भागात तुकडोजी महाराज सभागृह, मोहीतकर व व-हाटे यांचे घर उत्तर भागात महादेव मोटर्स समोरील रस्ता व गौरकार यांचे घर तर दक्षिणेस ढवस, छाजेड व गुप्ता यांचे घर या भागाचा समावेश आहे. या भागात विना परवानगी प्रवेश करणे व विना परवानगी या क्षेत्रातून बाहेर निघण्यास बंदी आहे. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच या क्षेत्रात प्रवेश मिळणार असून त्यासाठी पासेस काढावे लागणार आहेत असून या क्षेत्राबाबतचे सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना दिले आहे.
संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून संपर्क साधा: डॉ. शरद जावळे
तिस-या व्यक्तींच्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या आहेत. त्यांना सध्या ट्रेस करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोबाईल लोकेशन तसेच संपर्क साधून आम्ही याबाबत माहिती काढत आहोत. याशिवाय तिस-या पॉजिटिव्ह व्यक्तीच्या ज्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने संपर्कात आल्या आहेत, त्यांनी स्वत:हून समोर यावे. परिसरात कुणालाही कोरोनासदृष्य लक्षणं आढळल्यास त्यांनी त्वरित कोविड केअर सेंटर परसोडा येथे भेट द्यावी. लोकांनी घाबरू नये तसेच कुणी सर्वेक्षण करण्यासाठी आले किंवा कुणाला कोरोनासदृष्य लक्षणं आढळल्यास अशी माहिती न लपवता त्याची माहिती प्रशासनाला द्या.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी वणी
प्रसासनाक़डून सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून व प्रसार वाढू नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले आहेत त्या लोकेशनपासून 200 मीटरचा संपूर्ण परिसर सिल करण्यात आला असून हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. यात प्रभाग 2 व प्रभाग 3 चा काही भाग आहे. नगरपालिकेने प्रत्येक प्रभागात कोरोनाविषयी सर्वेक्षण सुरू केले आहे. तर प्रशासनाने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून कोणतीही अफवा पसरवू नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क लावावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, डबल सिट प्रवास करू नये यासह प्रशासनाने जी गाईडलाईन दिली आहे त्याचे पालन करावे असे आवाहन केले आहे.