श्री गणेश योगींद्राचार्य

गणेशोत्सव स्पेशल लेखमाला

0

बहुगुणी डेस्क, वणी: गणेश या तीन अक्षरावर रोज तीन तास बारा वर्षे विवेचन करता येते असे अत्यंत सार्थ रीतीने सांगू शकणारे आधुनिक महर्षी म्हणजे महागाणपत्य परमपूज्य गजानन महाराज पुंडशास्त्री. आपल्या ८१ वर्षाच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्या तपश्चर्येतून आणि चिंतनातून पुनरुद्दीपित केलेल्या गाणपत्य संप्रदायाच्या महान रहस्यांचे शब्दबद्ध रूप म्हणजे श्री गणेशोपासना तथा श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण या दोन अतुलनीय ग्रंथ मालिका.

२१ ग्रंथात्मक श्रीगणेश उपासना ग्रंथ मालिकेची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम रुपात नोंद झाली आहे एवढी एक गोष्ट सांगितली तरी या उपक्रमांचे अद्वितीयत्व लक्षात येईल. या सर्व ग्रंथमालेत मांडलेले विषय ज्या महान गाणपत्य विभूतीच्या कृपाप्रसादाने आज आपल्याला उपलब्ध आहेत त्यांचे या मालिकेत प्रकाशित चरित्र म्हणजे या ग्रंथ मालिकेतील ९ वा दूर्वांकुर श्री गणेश योगींद्राचार्य.

श्रावण शुद्ध पंचमी शके १४९९ ते माघ वद्य दशमी शके १७२७ असे तब्बल २२८ वर्ष हे योगीराज श्रीक्षेत्र मोरगाव येथे निवासाला होते एवढी एक गोष्ट सांगितली तरी आपल्याला या चरित्राबद्दल विलक्षण उत्सुकता वाटेल यात संशय नाही. श्रीक्षेत्र मोरगाव येथे भगवान श्री मयुरेश्वर यांच्या मंदिरात निवास करणाऱ्या श्री गणेश योगीन्‍द्राचार्य महाराजांना स्वतः श्री मोरयाने प्रगट होत श्रीमुद्गलपुराणाचे नऊ खंड, नऊ वेळा येऊन आपल्या हाताने प्रदान केले. असा यांचा लोकोत्तर अधिकार.

आज आपल्याला गाणपत्य संप्रदायाची जी काही सैद्धांतिक भूमिका उपलब्ध आहे त्या सर्व उपलब्धींना केवळ श्री गणेश योगींद्रांची कृपा हा एकच शब्द लागू पडतो. सौराष्ट्र प्रांतातील श्री मयुरेश्वर शास्त्री आणि त्यांच्या सहधर्मचारीणी देवी सुशीला या दाम्पत्याने श्रीक्षेत्र मोरगाव येथे श्रीमयुरेश्वराच्या केलेल्या कठोर तपाचरणाचे फलस्वरूपात ही महाराजांचा अवतार झाला.

प्रस्तुत ग्रंथात या तपाचरणाचे विविध पैलू, श्री गणेश यांची अवतरण कथा, त्यांच्या बाललीला, आरंभी पासून गणेश भक्तीचे असलेले वेड आणि केलेली साधना या सगळ्याचे वर्णन लेखक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी अत्यंत रोमांचक आणि मनोवेधक पद्धतीने आपल्यासमोर सादर केले आहे.

श्रीमुद्गलपुराणाची दिव्य प्राप्ती, त्यावर केलेले अद्वितीय भाष्य, श्रीगणेश गीतेवर रचलेली श्री योगेश्वरी नावाची अतिविशाल टीका, श्री गणेश विजय समान अपूर्व ग्रंथ अशा त्यांच्या अपार वाङ्मयीन कार्याचा लेखकाने त्यांच्या विविध वैशिष्ट्यांसह प्रस्तुत पुस्तकात परिचय करून दिला आहे.

भारतीय संस्कृतीमधील कोणत्याही महापुरुषाचे चरित्र घेतले की त्यामध्ये अनिवार्यरीत्या सापडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी केलेले विविध चमत्कार. आपल्या गुरूंचे अलौकिकत्व सांगण्याच्या नादात अनेकदा तसे चमत्कार रंगवून दाखविले जात असले तरी मुळातच अद्वितीय असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांचा काही लीला आपल्या क्षमतांच्या पलिकडच्या असल्यामुळे आपल्याला त्या चमत्कार वाटतात.

वास्तविक त्यांनी केलेले ते सहज कार्य असते अशी भूमिका मांडून श्री पुंड सरांनी श्री गणेश योगींद्राचार्य महाराजांच्या जीवनातील विविध चमत्कार सांगत त्यातून आपल्याला शिकण्यासारखे सूत्र कोणते आहे? याचे जे निरूपण केले आहे. ते खर्‍या चिंतनाचा विषय आहे.

श्रीगुरुंची गुरुस्वरूपाची योग्यता ठरते की त्यांच्या शिष्यांच्या पात्रते वरून. श्री सुब्रह्मण्य, श्री सिद्धेश्वर, श्री ढुंढिराज आशा श्री गणेश योगींद्राच्या विविध शिष्यांच्या कथा देखील अनुषंगिकरीत्या आल्या आहेत. त्यांना केलेल्या उपदेशाच्या निमित्ताने येथे भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आणि गाणपत्य संप्रदायाच्या प्रकट केलेल्या सिद्धांतांचे स्वरूप खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा विषय आहे.

कोणत्याही महापुरुषांचे चरित्र पूर्ण श्रद्धा युक्त रीतीने मात्र तरीही तर्कसंगती ला न सोडता कसे अभ्यासावे याचा सुंदर वस्तुपाठ आहे श्री गणेशयोगींद्राचार्य.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.