‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ची हाक

सीतादही पूजनासह कापूसवेचणीला वणीत आरंभ

1

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः ‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ही हाक धरतीला, निसर्गाला दिली, की सीतादहीची पूजा संपते. पूजेतल्या दहीभाताची शितं शेतात फेकली जातात. या शितांवरूनच या विधीला शिताई किंवा सीतादही म्हणतात. या पूजेनंतरच कापूसवेचणीला सुरुवात होते. याची पूजा आणि त्यामागील लॉजिकही खूप रंजक आहे.

सीता ही जनकराजाला शेतीत मिळाली असं मानतात. त्यामुळे सीतेला भूमिकन्यादेखील मानतात. शेतात कापूस तयार झाला, की निसर्गाला थँक्स म्हणून कापूसवेचणीला आरंभ होतो. ही निसर्गाचे आभार मानण्याची प्रक्रिया आहे. या विधीलाच ‘सीतादही’, शिताई अशी विविध भागांत विविध नावे आहेत. अन्नाची शितं आणि दही यांचा वापर होत असल्याने याला ही नावं मिळाली असावीत.

हा निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा

कापूस वेचणीसाठी तयार झाला, की त्यापूर्वी शेतकरी निसर्गाचे आभार मानतात. कापूस तयार होण्यासाठी जमीन, पाणी, सूर्यप्रकाश, नैसर्गिक शेणखत असे विविध घटक सहकार्य करतात. या सर्वांची प्रतीकात्मक पूजा करून आभार मानतात. या पूजेत निसर्गातील घटकांचाच वापर पूर्वी व्हायचा. शेतातल्या कापसाचाच पाळणा तयार करतात. तिथलीच फुलं, पानं यांचा पूजेसाठी वापर करतात. तिथल्याच मातीचं, रेतीचं किंवा दगडाचं शिवलिंग तयार करतात. निसर्गाने दिलेलं हे पहिलं पीक निसर्गालाच अर्पण केलं जातं.
 प्रा. दिलीप चौधरी 
कृषितज्ज्ञ, चंद्रपूर

 

 

कापसाचा पाळणा महत्त्वाचा

सीतादहीची पूजा झाल्यावरच कापूसवेचणी सुरू करतात. यावेळी दही आणि भाताचा नैवेद्य दाखवतात. ही शितं शेतात फेकतात. प्रा. चौधरी यांनी शिताई हा शब्द वापरला. त्याचाही तो संदर्भ शितांमुळे लागू शकतो. शेती आपल्याला वर्षभर काहीना काही देतच असते. आपणही तिला काहीतरी दिलं पाहिजे. या भावनेतून ही क्रिया होते. आताच्या काळात नारळ, पेढे हेही प्रसाद म्हणून वाटतात. कापसाच्या पाळण्याची पूजा ही सर्वात महत्त्वाची. या पूजेला शेतकऱ्याचा पूर्ण परिवारच उपस्थित असतो. शेतातले कामगारही यावेळी हजर असतात.

मंगेश तायडे, मिलिंद ढवस
शेतकरी

पूर्वी कापूस हा दिवाळीच्या आसपास किंवा नंतरच निघायचा. आता मात्र विविध वाण आल्यामुळे तो आधीच निघतो. कापसावरच शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बाजू अवलंबून असते. नंतर सोयाबीन आणि विविध पिकांचा समावेश यात झाला. हल्ली दसऱ्याच्या पूर्वीच कापूस वेचायला सुरुवात होते. सीतादही किंवा शिताई या पूजेच्या वेळी गाईच्या दुधापासून केलेलं दही वापरतात. शक्यतो ते घरचंच असतं. काही भागांमध्ये 7 दगड कपाशीच्या झाडाजवळ ठेवतात. कापसाचीच प्रतिमा तयार करतात. त्याला ‘गोपा’ असं म्हणतात.

या ‘गोपा’ला कापसाच्या पाळण्यात ठेवतात. या पूजेत दहीभात शेतातील पिकांवर शिंपडतात. त्यामुळे निसर्गाची कृपा होते असं मानतात. मित्रकीटक पिकांचं रक्षण करतात आणि शत्रूकीटक दूर पळतात, अशीही एक भावना यामागे आहे.

शेतकरी हा निसर्गाचा खरा प्रतिनिधी आहे. तो निसर्गाच्या उपकारांची जाण ठेवतो. त्यामुळेच पोळा, नागपंचमी, गाईगोधन, गुढीपाढवा अशा या ना त्या निमित्तानं तो निसर्गाला ‘थँक्स’ देत राहतो. आपणही या निमित्ताने निसर्गाला थँक्स म्हणूयात.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.