बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील एका स्मॉल फायनान्स कंपनीत सुमारे 6 लाखांची अफरातफर केल्या प्रकरणी कंपनीचा माजी शाखा व्यवस्थापक व 2 माजी संगम मॅनेजर अशा 3 कर्मचा-यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी कर्जदारांकडून आलेले पैसे बँकेत जमा न करता परस्पर खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अफरातफर उघडकीस येताच या तिघांनीही पैसे परत करण्याचे वचन दिले. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून या तिन्ही कर्मचा-यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड ही एक स्मॉल फायनान्स (सुक्ष्म कर्ज) कंपनी असून ती इंडसइंड या खासगी बँकेची उपशाखा (सबसिडरी) आहे. या फायनान्स कंपनीचे वणी येथील दामले फैल येथील उमंग अपार्टमेंट येथे कार्यालय आहे. ही फायनान्स कंपनी गरजूंना कर्ज पुरवठा करते. याशिवाय म्युच्युअल फंड, विमा काढणे इत्यादी कामे ही करते.
या कंपनीत 10 कर्मचारी काम करतात. आरोपी वैभव किसनराव ठाकरे (25) रा. सावळा पोस्ट वडगाव जि. यवतमाळ हा या कंपनीत गेल्या एक ते दीड वर्षांपासून शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तर आरोपी ऋषिकेश रामदास जांभुरे (22) रा. मुदनी ता. बाभुळगाव जि. यवतमाळ व आरोपी अक्षय महादेव सिडाम रा. झटाळा ता. घाटंजी हे दोघेही गेल्या वर्षभरापासून कंपनीत संगम मॅनेजर पदावर कार्यरत होते.
वैभव शाखा व्यवस्थापक असल्याचे त्याच्याकडे बँकेच्या तिजोरीची एक चाबी असायची. दिवसभरात जेवढी रक्कम कंपनीकडे जमा व्हायची ती रक्कम तिजोरीत जमा करण्याचे काम त्याच्या कडे होते. तर ऋषिकेश व अक्षयकडे संगम मॅनेजर म्हणून कर्ज वसुलीची रक्कम, विम्याची रक्कम गोळा करणे व आलेली रक्कम बँकेच्या तिजोरीत जमा करण्याचे काम होते. याशिवाय कॅशिअर सुट्टीवर असल्यास त्याची एक चावी देखील संगम मॅनेजरकडे असायची.
गेल्या वर्षी दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी आरोपी वैभव किसनराव ठाकरे, व ऋषिकेश रामदास जांभुरे यांनी बँकेकडे जमा झालेले 2 लाख 97 हजार 950 रुपये हे बँकेच्या तिजोरीत जमा केले नाही. तर आरोपी अक्षयने दिनांक 15 फेब्रुवारी ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत विविध कर्जदारांकडून प्राप्त झालेली 3 लाख 9 हजार 254 रुपयांची गोळा झालेली रक्कम बँकेच्या तिजोरीत जमा केली नाही.
काही दिवसातच या तिघांनेही केलेली अफरातफर कंपनीच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी या तिघांनाही बँकेच्या तिजोरीत तात्काळ पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे परत करण्यास तिघांनीही 8 दिवसांचा वेळ मागून घेतला. मात्र 8 दिवस झाल्यानंतरही त्यांनी पैसे परत केले नाही. कंपनीचे अधिकारी त्यांना पैशासाठी कॉल करायचे तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.
अखेर पैसे परत मिळणे अशक्य असल्याचे लक्षात येताच युनिट मॅनेजरतर्फे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. वणी पोलीस ठाण्याने पैशाचा अपहार केल्या प्रकरणी या तिन्ही आरोपींवर भारतीय दंड विधानच्या कलम 403, 406, 408, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.