विवेक पिदूरकर, शिरपूर: सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असली तरी अद्याप दारू विक्री सुरू न झाल्याने वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरू आहे. कारवाईच्या भीतीने तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत. आज शिरपूर पोलिसांनी गाडीच्या बोनेटमध्ये लपवलेला दारूसाठा नाकाबंदीदरम्यान जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, रवि ऊर्फ संतोष रामअवतार (25) व सुधाकर गुरूनाथ काढून (21) दोघेही राहणार गडचांदूर जिल्हा चंद्रपूर हे वणीहून टाटा सुमो (MH 34 AM1857) या गाडीने देशी दारुचा स्कॉक घेऊन गडचांदूरला जात होते. दरम्यान संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास चारगाव चौकी येथे त्यांची गाडी पोहोचली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी सदर गाडीला थांबवले.
त्यांच्या गाडीत काहीही आढळून आले नाही. मात्र त्यांचे वर्तन संशयास्पद होते. त्यामुळे नाकाबंदी करणा-या पोलिसांनी गाडीचे बोनेट काढून चेक केले असता तिथे मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला. गाडीतील दोघांनाही या साठ्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तो साठा गडचांदूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
पोलिसांनी देशी दारूच्या 180 मीलीच्या 8 पेट्या ज्याची किंमत 19,968 रुपये व टाटा सुमो ज्याची किंमत 5 लाख रुपये असा एकूण 5 लाख 19,968 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी रवि ऊर्फ संतोष रामअवतार (25) व सुधाकर गुरूनाथ काढून (21) रा. गडचांदूर या दोघांवरही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ) (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार सचिन लुले, यांच्या मार्गदर्शनात पोउनि कांडुरे, सुगद दिवेकर, सुनिल दुबे, अमित पाटील यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठली असली तरी वणीतून दारूची तस्करी अद्यापही सुरूच आहे. आज दुपारी उकणी जवळ एका तस्कराला विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना अटक केली होती. त्यानंतर संध्याकाळी ही दुसरी कारवाई आहे. दारूची वाहतूक करणा-यांवर कारवाई होत आहे. मात्र त्यांना अवैधरित्या सप्लाय करणा-यांवर मात्र कधीच कारवाई झालेली दिसलेले नाही.
हे देखील वाचा:
शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान