विलास ताजने, वणी: साप चावल्यावर व्यक्तीला तर पहिल्यांदा धक्काच बसतो. तो भांबावतो. काय करावं हे त्याला कळत नाही. साप चावल्याच्या धक्क्यानेही अनेकदा नुकसान होतं. यावेळी योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. तो निर्णय घेतला बोरगाव (मेंढोली) येथील एका शेतमजुरानं. धोंडिबा प्रकाश तोंगरे या शेतमजुरानं साप चावल्यावर कुऱ्हाडीने चक्क आपलं बोटच तोडलं.
पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत ‘धैर्य हे संकटाविरुद्ध खात्रीशीर शस्र आहे.’ हे सर्वश्रुत आहे. ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. त्याला जिंकण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आत्मविश्वासामुळे मनुष्याची ताकद दुप्पट आणि योग्यता चौपट होत असते.
अशा व्यक्तींवर कोणतेही आणि कितीही मोठे संकट आले. तरी धैर्यवान व्यक्ती त्या संकटाला घाबरत नाही. अगदी मृत्यू समोर दिसत असताना देखील शेवटच्या क्षणापर्यंत निकराची झुंज देतो, नव्हे तर मृत्यूच्या दारातून स्वतःची सुटका करून घेतो.
मग आपण म्हणतो की, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ काहीसा असाच धक्कादायक तेवढाच आश्चर्यकारक प्रकार बोरगाव (मेंढोली) येथील एका शेतमजुराच्या बाबतीत घडला. धोंडीबा प्रकाश तोंगरे अशा या 32 वर्षीय धैर्यवान शेतमजुराचं नाव.
वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) या गावात शेतगडी म्हणून चाकरी करण्यासाठी अनेक मजूर वास्तव्यास आहे. धोंडीबा हा त्यापैकी एक. मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नारायणगुडा गावचा रहिवासी असलेला. मात्र गेल्या चार वर्षांपासून सहकुटूंब बोरगावात राहतो. यंदा तो प्रफुल बाबाराव कोल्हे या शेतकऱ्याकडे शेतगडी म्हणून कामाला आहे.
1 डिसेंबरला मंगळवारी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान धोंडीबा शेतात तुरीवर फवारणी करीत होता. एका पालवीत दबा धरून बसलेल्या सापाने डाव्या पायाच्या मधल्या बोटाला दंश केला. दंश होताच धोंडिबानं पायाकडे नजर टाकली. तर एका भल्या मोठ्या विषारी नागाने त्याच्या पायाला चावा घेतल्याचे दिसून आले.
सापालाही धाडले यमसदनी…मरणाच्या भीतीने तो क्षणभर घाबरला. परंतु म्हणतात ना, ‘हिम्मत सबसे बडी चीज है’ नेमका या उक्तीचा परिचय देत प्रसंगवधान राखत थोड्या अंतरावर बैलबंडीवर ठेवलेल्या कुऱ्हाडीने चक्क सापाने चावा घेतलेल्या बोटावर जोरदार प्रहार केला. बोट तुटले प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. पाय रक्ताने माखला. मात्र अशा भयावह अवस्थेत धोंडोबाने पाठलाग करत सापाला ठार मारले.
समयसूचकता दाखवत घडलेल्या प्रसंगाची माहिती मालकाला दिली. गावातील लोक घाईगडबडीत शेतात पोहचले. घडलेला प्रसंग निश्चितच अंगावर शहारे आणणारा होता. एका बाजूला धोंडीबाचा रक्तबंबाळ पाय अन् दुसरीकडे भला मोठा मृत साप मोठं विचित्र दृश्य पाहून उपस्थित अचंबित झाले. मात्र त्याचक्षणी धोंडीबाच्या हिम्मतीची वाहवा प्रत्येकांच्या तोंडी होऊ लागली.
सहकाऱ्यांनी जखमी धोंडीबाला त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. निश्चितच धोंडीबाच्या ’प्राणावर आले पण बोटावर निभावले’ असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा