अॅड. सूरज महारतळे यांना ऑनलाईन महाराष्ट्र “कृषीरत्न पुरस्कार”
राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन 2020
जब्बार चिनी, वणी: राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन पुरस्कार अॅड. सूरज महारतळे यांना मिळाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने महासंमेलन ऑनलाईन झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून सूरज यांच्यासह अनेकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
या सोहळ्यात सूरज वामन महारतळे यांच्या कृषी विभागातील कामगिरी बघता त्यांना महाराष्ट्र कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यातच सर्व मानकऱ्यांना इ-मानपत्रे त्यांच्या व्हाट्सअपवर देण्यात आलीत. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. केशव महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी पुरस्काराच्या प्रेरणेतून आपले भारत राष्ट्र अधिक शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन केले. दुर्जन शक्तीच्या वाढत्या प्रादुर्भावाला जर पराभूत करायचे असेल तर तुमच्यासारख्या गुणवंतांच्या सज्जन शक्तीचे संघटन देशात निर्माण व्हायला हवे; असेही प्रतिपादन त्यांनी केले. तत्वचिंतक ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर, ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंद जवळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, आदर्श शिक्षिका मनीषा कदम घार्गे
विनया जाधव, प्राचार्या रोशनी शिंदे, प्राचार्या कल्पिता पर्शराम, प्राचार्या प्रगती साळवेकर, सामाजिक नेत्या डॉ. शुभदा जोशी तसेच धडाडीच्या आयकर अधिकारी अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली. व्हिडिओद्वारे आपले शुभसंदेश दिलेत. यावेळी शिवयोगी आणि प्रगतिशील शेतकरी उद्योजक पांडुरंग दादा मातेरे उपस्थित होते. या राज्यस्तरीय ऑनलाईन समारंभाचे अतिशय उत्तम व्यवस्थापन राजेंद्र सरोदे यांनी पाहिले.
या ऑनलाईन समारंभाचे सूत्रसंचालन गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांनी केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात ऑनलाईन मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.