वणी बसस्थानकातून धावलेल्या बसवर करंजीजवळ दगडफेक

दुसरी बस यवतमाळ येथे अडवली, चालक वाहकाचा पक्षाच्या पदाधिका-यासोबत वाद.... आज धावली नाही एकही बस... प्रवाशांचा हिरमोड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी वणी आगारातून तब्बल 27 दिवसानंतर दोन बस धावल्या. मात्र या दोन्ही बसचा प्रवास तणावाचा ठरला. एक बस यवतमाळ येथे एका पक्षाच्या पदाधिका-यांनी अडवली. तिथे त्यांचा चालकासोबत वाद झाला. तब्बल 3 ते 4 तास हा वाद रंगला. तर एका बसवर परतीच्या प्रवासाच्या वेळी करंजी जवळ दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटली आहे. या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आज वणी स्थानकातून एकही बस धावली नाही.

मंगळवारी सकाळी 10.20 मिनिटांनी पहिली बस (MH 40 N 8953) वणी आगारातून 10 प्रवाशांना घेऊन निघाली. दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही बस यवतमाळ येथे पोहेचली. संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास चालक अंकुश आत्राम व वाहक अंकुश पाते यांच्यासह बस वणीसाठी परत निघाली. मात्र संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास करंजीजवळ पुलाखाली या बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीची काच फुटली.

घडलेल्या प्रकारामुळे चालक व वाहक दोघेही दहशतीत आले. त्यांनी तातडीने याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली. मात्र सदर हद्द मारेगाव पोलीस स्थानकात येत नसल्याने चालकाने याबाबत करंजी येथील वाहतूक पोलीस चौकीवर तक्रार नोंदवली. त्यानंतर मारेगाव पोलिसांच्या संरक्षणात या बसला राजूर पर्यंत पोहोचवण्यात आले. रात्री उशिरा ही बस वणी येथे पोहोचली.

दुस-या बसबाबत यवतमाळ येथे राडा
दुसरी बस (MH 40 N 8675 ) ही दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास वणीहून यवतमाळला निघाली. दुपारी  2.30 वाजताच्या सुमारास बस यवतमाळ येथे पोहोचली. मात्र बस स्थानकावर बस पोहोचण्याच्या एक किलोमीटर आधीच आंबेडकर चौक येथे एका पक्षाच्या पदाधिका-यांनी बस अडवली. तिथे त्यांचा चालकाशी बराच काळ वाद झाला. हा वाद चांगला 3 ते 4 तास रंगला. अखेर हा वाद संपल्यानंतर बस यवतमाळहून वणीसाठी परत निघाली.

आज बस धावलीच नाही
कालपासून बस सुरू झाल्याने आज प्रवाशांनी बस स्थानक गाठले. मात्र दोन्ही बसबाबत झालेल्या प्रकारामुळे आज कुणीही कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. त्यामुळे आज एकही बस वणी डेपो वरून धावली नाही. परिणामी प्रवाशांचा हिरमोड झाला. तर दुसरी कडे झालेल्या प्रकारामुळे प्रचंड तणावाचे निर्माण झाले असून चालक वाहक दहशतीत आले आहे.

वरून आदेश येताच निलंबनाची कार्यवाही – आगार प्रमुख
काल झालेली घटना ही दुर्दैवी घटना आहे. कालच्या प्रकारामुळे आज कुणीही रुजू झाले नाही. आता पर्यंत 23 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले असून 13 कंत्राटी कर्मचा-यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. वरून आदेश येताच आणखी काही कर्मचा-यांवर कार्यवाही केली जाईल. संपकरी कर्मचा-यांनी ताबडतोब रुजू होऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
– सुमेध टिपले, आगार प्रमुख

कर्मचा-यांनी प्रशासनास सहकार्य करू नये – संपकरी
शासनाने दंडेलशाहीचे धोरण अवलंबले आहे. संप फोडण्यासाठी ते कर्मचा-यांवर प्रचंड दबाव आणत आहे. मात्र या दबावाला बळी न पडता कर्मचा-यांनी आपले सहकारी असलेल्या संपकरी कर्मचा-यांना सहकार्य करावे. संपकरी अजूनही एकत्रच असून त्यांनी प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नये.
– मिलिंद गायकवाड, संपकरी कर्मचारी

हे देखील वाचा:

तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून धावली लालपरी

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

Comments are closed.