केवळ दोन दिवसांसाठी गेले आणि 24 दिवस थांबले

आयसोलेशनचे 'ते' 24 दिवस कधीही विसरणार नाही

0

जब्बार चीनी, वणी: निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या वणीतील चौघांना (3+1) मोबाईल लोकेशन ट्रेस करून 1 एप्रील रोजी यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. केवळ दोन दिवसांचे काम आहे इतक्या माहितीवर गेलेले त्या तिघांना तब्बल 24 दिवसानंतर सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ते वणीतील आपल्या निवासस्थानी आहेत. त्यांना यवमताळ मधील दोन आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्या वॉर्डमध्ये असताना त्यांनी काय केले? त्यांचा अनुभव कसा होता? याविषयी आपण जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात…

आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की आम्हाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. आम्ही निजामुद्दीन दर्गावर गेलो होतो. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्हाला यवतमाळला घेऊन जाण्यासाठी ऍम्बुलन्स आली. त्यावेळी आम्हाला केवळ दोन ते तीन दिवसांची गोष्ट आहे असे सांगण्यात आले होते. दोन ते तीन दिवस रिपोर्ट येण्यासाठी लागतात ते आले की घरी परत जाता येईल या आशेवर आम्ही होतो. आमच्या सोबत आणि आमच्या मागून आलेले इतर संशयीत परत गेले पण आम्हाला 24 दिवस थांबावे लागले.

संशयीत म्हणून यवतमाळला आल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. तिथे आमच्या घशातील स्त्राव टेस्टसाठी घेतला गेला. ते सॅम्पल नागपूरला पाठविण्यात आले. दोन चार दिवस तर काही वाटलं नाही. पण जेव्हा इतर लोक घरी परत जात होते. तेव्हा मात्र मनात वेगवेगळ्या शंका यायच्या. पण त्यात एका गोष्टीने मात्र आम्हाला पूर्ण साथ दिली ती म्हणजे मोबाईल. तिथे मोबाईल वापरण्याची पूर्ण मुभा होती.

इतरांपासून वेगळे असलो तरी आम्ही जगापासून तुटलोय असे आम्हाला कधीही वाटले नाही. मोबाईलवरून व्हिडीओ कॉलकरुन आम्ही आमच्या कुटुंबियांच्या संपर्कात असायचे. रुग्णालयात बराच मोकळा वेळ असल्याने मोबाइलवर नेटफ्लिक्सवरचे सिनेमे बघायचो. रुग्णालयातील सर्व सुविधाही एखाद्या हॉटेलपेक्षा कमी नव्हत्या. शासकीय रुग्णालयात असते तशी परिस्थिती तिथे बिलकूल नव्हती. तिथे स्वच्छता पाळली जायची.

प्रातिनिधिक फोटो

सकाळ संध्याकाळ डॉक्टर तपासणीसाठी यायचे. सकाळी 8.30 ला पहिला नाश्ता, दुपारी 12.30 ला जेवण, पुन्हा 3.50 वाजता चहा बिस्कीट व संध्याकाळी 7 च्या जवळपास जेवण यायचे. सर्व पदार्थ उत्तम असायचे. दरम्यान आम्ही दिवसातून पाच वेळा नमाज पडायचो. आमचा पहिला रिपोर्ट तब्बल 9 दिवसानंतर आला. काहीही झाले नाही असा विश्वास होता पण मनात एक धाकधूक होतीच. रिपोर्ट उशिरा येण्याचे कारण म्हणजे नागपूर येथील टेस्टिंग मशिन खराब झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आमचा 9 एप्रीलचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे आम्ही सर्व टेन्शनमुक्त झालो.

रिपोर्ट आल्यानंतर कहाणीमे ट्विस्ट….
रिपोर्ट निगटिव्ह आल्याने आम्हाला घरी जाण्याचे वेध लागले. कधी घरी जातो आणि कधी नाही असे झाले होते. वणीतील इतर लोक ही आधीच गेल्याचे कळले होते. पण अशी एक घटना घडली की आमचा मुक्काम आणखी वाढला. आम्हाला आणखी काही दिवस थांबावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. आमच्या बाजुच्या रूम मधील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमची पुन्हा टेस्ट घेण्यात आली व आम्हाला धामणगाव रोड वरील बिल्डींग मध्ये शिफ्ट करण्यात आले. घरी जाण्याच्या आमच्या आशेवर पाणी फिरले.

आणखी एक आठवडा कसाबसा काढला. पण 18 एप्रील नंतर आमचा एक एक दिवस काढणे कठिण झाले. 25 पासुन रमजान महिना सुरू होणार असल्याने त्याआधी जाणार मिळेल की नाही याची चिंता सतावत होती. अखेर आमचा रिपोर्ट आला. रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह होता. शेवटी आम्हा चार पैकी तिघांना शुक्रवारी संध्याकाळी सुटी देण्यात आली व आम्हाला 9 मे पर्यत होम क्वारंटाईन राहण्याचे सांगण्यात आले. रात्री आम्ही वणीत पोहोचलो. उरलेल्या एका युवकालाही एक दोन दिवसात सुटी देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी सकाळी पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी काही सुचना देउन गेल्याचेही त्यांनी सांगितले.

रमजान सुरू व्हायच्या आधी सुट्टी मिळाल्याने आनंद होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. मात्र त्यांच्या सोबत असलेला चौथा साथीला मात्र अद्याप सुट्टी मिळाली नाही. तो मुळातच निजामुद्दीनला गेला नव्हता व यवतमाळ येथे ही त्याच्यासोबत एक वेगळीच ट्रॅजेडी घडली त्यामुळे त्याचा मुक्काम आणखी दोन तीन दिवसांसाठी वाढला. काय होती ती ट्रॅजेडी हे आपण पुढच्या भागात बघू….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.