विद्यार्थ्यांनी टाकला चक्क शाळेवर बहिष्कार

दोन दिवसांपासून मुलांनी केले शाळेत जाणे बंद, प्रशासनाचं दुर्लक्ष

0

वणी: वणी तालुक्यातील ढाकोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची कमतरता आहे. त्यामुळे इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांचे कक्षात शाळा भरवली होती. मात्र गटविकास अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांवर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकाराचा निषेध म्हणून या शाळेतील 90 विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून शाळेवरच बहिष्कार टाकलाय.

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ढाकोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 90 विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ तीनच शिक्षक आहेत. या शाळेतील तीन जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मागणीसाठी येथील शाळा व्यवस्थापन समितीने याआधी पंचायत समितीकडे निवेदने दिली होती. परंतू पंचायत समितीने या निवेदनाला केराची टोपली दाखवली.

तालुक्यात शिक्षक संख्या जास्त असताना त्यांना या शाळेत नेमणूक दिली नाही. शिवाय नुकत्याच झालेल्या समायोजनात अहेरी येथील तीन शिक्षकांचे लगतच्या तालुक्यात समायोजन करण्यात आले. वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शाळेत रिक्त जागा असताना या तीनही शिक्षकांना तालुक्याच्या बाहेरच्या शाळेत जावे लागले हे विशेष. जर का या शाळेतील रिक्त पदे फलकावर दाखविली असती, तर येथील शिक्षकांनी तालुक्यातीलच शाळा निवडली असती. मात्र पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केले. सोबतच नवेगाव येथील शाळेत एका विद्यार्थ्याला शिकविण्यासाठी चक्क दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक न मिळाल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समितीने चक्क गटविकास अधिकार्यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी 10 ऑगस्टपर्यंत शिक्षकांचे निर्धारन करण्याचे आश्वासन संबधीतांना दिले होते. त्यांनतर विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीने माघार घेतली होती. मात्र पंचायत समितीने आपल्यावरचे खापर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांवर फोडत कोणतीही पूर्वसुचना न देता व गटविकास अधिकारी राजेश गायनार यांनी गटशिक्षणाधिकारी यांना सुचना करून शाळा व्यवस्थापन समिती ढाकोरी विरूध्द पोलिसांत तक्रार द्यायला लावली.

तक्रारीवरून भास्कर वासेकर, रामकिसन येरगुडे व इतरांविरूध्द गुन्हे दाखल केले होते. या घटनेचा तीव्र निषेध करीत ढाकोरी येथील विद्यार्थ्यांनी चक्क शाळेवरच बहिष्कार टाकत शाळेत जाणेच बंद केले आहे.

या शाळेत लगतच्या गावातील एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती दिली आहे. मात्र शाळेत विद्यार्थीच नसल्याने शिक्षक शिकविणार कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकारात सबंधीत विभाग मात्र आपल्या चुकांचे खापर पालकांवर फोडून वरिष्ठाची दिशाभूल करताना दिसत आहे.

(न. प. शाळा क्र. 4 मध्ये राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम)

गेल्या दोन दिवसापासून ढाकोरी शाळेतील 90 विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला असताना, याबाबत प्रशासन मात्र काहीच हालचाली करताना दिसत नाही. एकूणच गटशिक्षणाधिकारी दडपशाही धोरणाचा अवलंब करीत ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना शिकण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप ढाकोरी येथील पालकांनी केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.