नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. आज बुधवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी नरसाळा येथे एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. सचिन दिवाकर बोढे (21) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही काळात नरसाळ्यात अर्धा डजनपेक्षा अधिक व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे नरसाळा हे दुसरे बोथबोडन तर होत नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहिती नुसार सचिन दिवाकर बोढे हा नरसाळा येथील रहिवाशी होता. आज सकाळी सचिनच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती शेतात गेले होते. दरम्यान सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास सचिनने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. दरम्यान मृतकाचे वडील दिवाकर घरी गेले असता त्यांना सचिनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी सचिनला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र परस्थिती गंभीर असल्याने त्याला वणी येथे रेफर केले. मात्र वणी जवळ त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूकाच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे.
तालुक्यातील नरसाळा ठरतेय दुसरे बोथबोडन?
सात आठ वर्षांआधी यवतमाळ जिल्ह्यातील बोथबोडन हे गाव अचानक महाराष्ट्रातच नव्हे तर देशात चर्चेत आलं. ते इथे होणा-या सततच्या आत्महत्येमुळे. दुर्दैवाने मारेगाव तालुक्यातील नरसाळ या गावाचीही आता त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे, लॉकडाउन पासून मारेगाव तालुका सततच्या आत्महत्येमुळे हादरला असताना त्यातच नरसाळा या गावातील आत्महत्येचा आकडा अर्धा डझनच्या वर गेला आहे. याकडे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)