वणीत स्वामिनीद्वारा दारूबंदीसाठी आंदोलन
वणी/विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी सोमवारी स्वामिनी या संघटनेने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. यवतमाळ जिल्हात संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे याकरिता आज महिलांनी वणीच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिले. दारूबंदीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातील कितीतरी आत्महत्या दारूमुळेच होतात. कृषी आयुक्ताच्या अहवालानुसार जवळपास 7.27 टक्के आत्महत्या या दारूमुळेच झाल्या. आशा शेतकऱ्यांना शासनाचा लाभही मिळत नाही. यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा मजूर वर्ग हा या जिल्ह्यात अधिक आहे. त्यांच्या घामाच्या मिळकतिचा मोठा हिस्सा ते दारूमध्येच घालावीत आहे. याचा फायदा फक्त सरकारची तिजोरी भरण्यातच होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी करावी अशी मागणी स्वामिनी संघटनेच्या महिलांनी केली.
28 एप्रिल 2015 मध्ये घाटंजी येथून दारूबंदी विरुद्ध पहिला मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर मुंबई येथे पावसाळी व नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महिलांनी यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीची मागणी केली. मात्र सरकारने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनानंतर कळंब ते नागपूर महिलांनी पदयात्रा करून सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
20 डिसेंबर 2017 नागपूर येथे मुख्यमंत्रांसोबत सकारात्मक चर्चाही करण्यात आली. परंतु या सरकारने या महत्वपूर्ण मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. 29 डिसेंबर 2017 रोजी लेखी पत्राद्वारे जर 31 मार्च 2018 पर्यंत दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु सरकार फक्त भूलथापा देऊन वेळ मारून नेत असल्याचे संघटनेच्या लक्षात आले आहे. म्हणून सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात संपुर्ण दारूबंदीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात तालुका संयोजक रुपेश ठाकरे, उमेश ढुमणे, सुरज महातरळे, प्रवीण खानझोडे, मंगेश रासेकर, विकेश पानघाटे, नितेश तुराणकर, दिलीप भोयर, सिध्दिक रंगरेज ,अमोल टोंगे व मोठया संख्येने महिलांनी आपला सहभाग दर्शविला.