विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुबीयांची प्रशासनानं घेतली भेट
टाकळीतील शेतकऱ्याला अद्याप मिळाली नाही आर्थिक मदत
रोहन आदेवार, कुंभा: टाकळी(कुंभा) येथे विषबाधेने मृत्यू झालेले शेतकरी शंकर गेडाम यांच्या कुटुंबीयांची रविवारी मारेगावचे तहसीलदार विजय साळवे व तालुका कृषी अधिकारी आर.आर.दासरवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृताच्या कुटुंबीयांचं सांत्वन करून त्यांच्या कुटुंबास शासनाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
शंकर विठ्ठल गेडाम (48) राहणार टाकळी हे 9 सप्टेंबरला दुसऱ्याच्या शेतामध्ये फवारणीला गेले होते. रात्री उशिरा त्यांची तब्येत बिघडली. त्यांना कुंभा येथे दवाखान्यात नेण्यात आले. मारेगाव शासकीय दवाखान्यात भरती करण्यात आले त्यानंतर पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे शासकीय दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र 17 सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात फवारणीमुळे मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने प्रशासनास जाग आली. एक महिन्यानंतर प्रशासनानं गेडाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार विजय साळवे व तालुका कृषी अधिकारी आर.आर.दासरवार, तलाठी वानखेडे, कोतवाल उत्तम आत्राम, पोलीस पाटील संगीता रा आदेवार, सरपंच चंद्रकला म्हसरकोल्हे, उपसरपंच हनुमान क जुमनाके व गावकरी उपस्थित होते.