Exclusive: शिक्षणाच्या आयचा घो ! जेव्हा चक्क गुरूजीच मारतात शाळेला दांडी…
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून दोन्ही शिक्षक गैरहजर
रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भुरकी येथील द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांनी चक्क शाळेला दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना दोन वाजेपर्यत वाट बघावी लागली. मुलं शाळेत वाट बघत होते पण दोनही शिक्षक शाळेत आलेच नाही. परिणामी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलाचं या प्रकारातून दिसून येत आहे.
वणी पंचायत समिती अंतर्गत येणारी शहरापासून १० किलोमीटरवर अंतरावर असलेली भुरकी येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा आहे. या शाळेत जवळपास वीस हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना शिकवायला दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मात्र हे दोनही शिक्षक आळीपाळीने शाळेला दांडी मारत असल्याचे पालकांच्या लक्षात आले होते. शुक्रवारी असाच प्रकार घडला या शाळेत कार्यरत असलेले बोंदाडे आणि महाजन या दोघांनीही चक्क शाळेलाच दांडी मारली. दुपारचे दोन वाजायला आले मात्र गुरुजींचा शाळेत पत्ताच नव्हता.
या प्रकाराची सरपंच अनिल सोनटक्के यांना माहिती मिळताच त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील शेडामे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप बदकी, दादाजी किनाके, नामदेव बदकी, नानाजी लांबट, किसन सोनटक्के, विजय निमसडे या पालकांना सोबत घेऊन शाळा गाठली. दरम्यान विद्यार्थी शाळा परिसरात दप्तर घेऊन उभे होते.
भुरकी येथील शाळेतील शिक्षकांनी व्यवस्थापन समिती ला व कोणालाही माहिती न देता चक्क शाळेला दांडी मारली. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून शाळा डिजिटल करण्यात येत आहे. मात्र या उपक्रमाला बगल देत शिक्षक चक्क शाळेलाच दांडी मारत आहे.
पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून हे शिक्षक केवळ वेतन घेण्यासाठीच आहे की काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता या प्रकाराकडे वणी पंचायत समिती शिक्षण विभाग नेहमीप्रमाणे पाठराखण करणार की कारवाई करणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.