सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील शाळेला शिक्षक द्यावे अन्यथा, पंचायत समितीसमोर शाळा भरवू, असा इशारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला दिला आहे.
भेंडाळा येथे पहिली ते सातवीपयंर्त वर्ग असून वर्ग १ ते ५ मध्ये ६१ विद्यार्थी, वर्ग ६ ते ७ पयंर्त ३० विद्यार्थी असे एकूण ९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ९१ विद्यार्थ्यांकरिता ५ शिक्षकांची गरज असताना फक्त तीनच शिक्षक कार्यरत आहे.
दोन शिक्षकांची कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेला दोन शिक्षक कमी असून, दोन शिक्षकांची पूर्तता त्वरित करावी अन्यथा, पंचायत समिती समोर शाळा भरवू, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती गिरसावळे, सपना खाडे, विनोद साखरकर, शंकर लेनगुळे यांच्यासह गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
विशेष म्हणजे दरवर्षी या शाळेत अशीच परिस्थिती निर्माण होत असून, वारंवार निवेदन देऊन शिक्षकाची मागणी करावी लागते. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शाळेत अशीच परिस्थिती असून विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.