नीलेश सपाटे यांची ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’साठी निवड
परमडोहच्या उपक्रमशील शिक्षकाचे सर्वत्र कौतुक
विलास ताजने, वणी: तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक नीलेश रामभाऊ सपाटे यांची यंदाच्या ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२०’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक सपाटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद, डायट सोलापूर आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कार प्रदान केला जातो. सोलापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स’ मध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कॉन्फरन्स मध्ये नामवंत संस्था, सनदी अधिकारी, शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी वर्ग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सर फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२०’ मधून या शिक्षकाची निवड करण्यात आली. पुरस्काराचे वितरण डिसेंबर महिन्यात होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सपाटे यांना जिल्हा आदर्श पुरस्कार २०१९, राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार आणि टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. उपसरपंच संदीप थेरे, ग्रामपंचायत सदस्य, पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपाटे यांचे अभिनंदन केले..
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)