अखेर राजूर येथील बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह

पाटाळाच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला राजूर कॉलरी येथील सम्यक तारक वाघमारे या युवकाचा वर्धा नदीत मृतदेह आढळून आला. भद्रावती तालुक्यातील तेलवासा पुलाजवळ वर्धा नदीच्या पात्रात सकाळी 9 वाजताच्या सुमारास सम्यकचा मृतदेह आढळून आला आहे. पाटाळ्याच्या पुलाजवळ सम्यकची दुचाकी आढळली होती. शनिवारी पाटाळ्याच्या पुलावरून त्याने उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सम्यक तारक वाघमारे (17) हा तरुण राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक 4 येथील रहिवाशी होता. तो काकाकडे राहायचा व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. शनिवारी दुपारच्या सुमारास तो काकाची गाडी घेऊन निघून गेला होता. संध्याकाळी घरी परत न आल्याने सम्यकच्या कुटुंबीयांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भद्रावती तालुक्यातील तेलवासा येथे पुलाचे काम सुरू आहे. हा पूल यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा पूल आहे. सकाळच्या सुमारास नदीच्या पात्रात काही मजुरांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गावातील पोलीस पाटलांनी याबाबत भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती दिली. भद्रावती पोलिसांनी वणी पोलीस स्टेशनला संपर्क साधून कुणी बेपत्ता आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांनी राजूर येथील एक तरुण बेपत्ता असल्याची तक्रार असल्याचे सांगितले. 

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सम्यकच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सम्यकचे कुटुंबीय तसेच जमादार वासूदेव नारनवरे घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांद्वारे मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह सम्यकचाच असल्याचे आढळले. सदर घटना भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याने तिथेच मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम होणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सम्यकने हे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

हे देखील वाचा:

Comments are closed.