निर्गुडा नदीत आढळले वृद्ध व्यक्तीचे प्रेत

तीन दिवसांपासून होते बेपत्ता

0

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या वृद्ध व्यक्तीचे प्रेत रविवार 21 फेब्रु. रोजी निर्गुडा नदीत मिळाले. शिवराम बळीराम गटलेवार (79) असे मृतकाचे नाव आहे. फिर्यादी विनोद शिवराम गटलेवार (52) रा. नारायण निवास वणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

मृतक शिवराम गटलेवार यांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यानंतर डोळ्यात रिकॅक्शन झाले होते. त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. दि. 18 फेब्रु. रोजी ते कोणालाही न सांगता घरुन निघून गेले. सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांचे पुत्र विनोद गटलेवार यांनी वणी पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार नोंदवली.

रविवारी सकाळी एका इसमाने सतीघाट परिसरात निर्गुडा नदीच्या पाण्यात एका व्यक्तीचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याचे सांगितले. विनोद गटलेवार यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता सदर प्रेत त्याचे वडील शिवराम गटलेवार यांचे असल्याचे दिसुन आले. विनोद यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

पिंपरी येथील विश्वासराव मोकाशी यांचे निधन

सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.